राहुल गांधींनी महिलांबद्दल वापरलेली ‘ती’ भाषा अयोग्य :स्वराज

Sushma Swaraj

टीम महाराष्ट्र देशा:नुकतीच भाजप आणि संघ महिलाविरोधी असल्याची टीका राहुल गांधींनी केली होती या टीकेला परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.एका राष्ट्रीय पक्षाच्या उपाध्यक्षपदी असलेल्या राहुल गांधींनी त्या पद्धतीची भाषा वापरायला नको होती. ते आता पक्षाचे अध्यक्ष होणार, अशीही चर्चा आहे. मात्र त्यांनी वापरलेली भाषा अयोग्य आहे तसेच ‘भाजपने देशाला ४ महिला मुख्यमंत्री, ४ महिला राज्यपाल, ६ केंद्रीय मंत्री दिल्या आहेत,’ याची आठवण स्वराज यांनी राहुल गांधी यांना करून दिली. अहमदाबादमध्ये महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
गुजरातमध्ये एका कार्यक्रमादरम्यान बोलताना भाजप आणि संघात महिलांना समान वागणूक मिळत नसल्याची टीका राहुल गांधींनी केली होती. ‘संघाच्या शाखेत एखाद्या महिलेला शॉर्ट्स घालून जाताना तुम्ही कधी पाहिले आहे का?,’ असा प्रश्न राहुल गांधी यांनी मंगळवारी एका कार्यक्रमात बोलताना विचारला होता. याबद्दल सुषमा स्वराज यांना अहमदाबादमधील कार्यक्रमात एका तरुणीने त्यांची प्रतिक्रिया विचारली. यावर उत्तर देतानास्वराज यांनी राहुल गांधी यांच्यावर पलटवार केला.
‘आमच्या सरकारआधी कधीही एखादी महिला सीसीएसची (कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी) सदस्य झाली नव्हती. भाजप सरकारच्या काळात या कमिटीतील ५ पैकी दोन सदस्य या महिला आहेत,’ अशा शब्दांमध्ये स्वराज यांनी राहुल यांच्या टीकेला उत्तर दिले. सीसीएसच्या कमिटीमध्ये पंतप्रधानांसह गृहमंत्री, परराष्ट्रमंत्री, अर्थमंत्री आणि संरक्षणमंत्री यांचा समावेश असतो. एका राष्ट्रीय पक्षाच्या उपाध्यक्षपदी असलेल्या राहुल गांधींनी त्या पद्धतीची भाषा वापरायला नको होती. ते आता पक्षाचे अध्यक्ष होणार, अशीही चर्चा आहे. मात्र त्यांनी वापरलेली भाषा अयोग्य आहे. त्यांनी पातळी न सोडता टीका केली असती, तर मी त्यांना जरुर उत्तर दिले असते,’ असे स्वराज म्हणाल्या.