fbpx

धक्कादायक : प्रा. सुषमा अंधारे यांच्यावर अज्ञातांकडून हल्ला

टीम महाराष्ट्र देशा- आपल्या आक्रमक भाषण शैली मुळे अल्पावधीत महाराष्ट्रभर आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या फुले-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या प्रा. सुषमा अंधारे यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये सुषमा अंधारे जखमीही झाल्या आहेत.मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये अज्ञातांनी हा हल्ला केला आहे. प्रा. सुषमा अंधारे यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

बुधवारी रात्री अंधारे या एका कार्यक्रमातून परतत होत्या. यावेळी नंबर प्लेट नसलेल्या गाडीने त्यांच्या गाडीला तीनवेळा जोराची धडक दिली अशी माहिती समोर येत आहे. यात सुषमा अंधारे यांच्या पाठीला मार लागला आहे. इंदूरपासून 15 किलोमीटर अंतरावर घटना घडली आहे.

मुंबई आग्रा महामार्गावर इंदूर बायपासवर मृदंग रेस्टॉरंटसमोर असलेल्या पुलालगत हा थरार साडेतीन मिनिटे सुरू होता. अंधार असल्याने धडक देणाऱ्या गाडीत किती लोक होते हे समजू शकले नाही. मात्र धडक देणाऱ्या गाडीच्या चालकाचा स्टेअरिंगवरील हात दिसत होता. त्याच्या हातात रंगीबेरंगी दोरे बांधल्याचे दिसत होते अशी माहिती सुषमाताई अंधारे यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर शेअर केली आहे.

कोण आहेत प्रा.सुषमा अंधारे ?
प्रा. सुषमा अंधारे या वकील, राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र विषयाच्या व्याख्यात्या, पुरोगामी स्त्रीवादी अभ्यासक, भटक्या विमुक्त व आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत. परळी हे त्यांचे मूळ गाव, पण सामाजिक चळवळींत अधिक सक्रिय रहाता यावे म्हणून त्या पुणे येथे स्थलांतरित झाल्या.सुषमा अंधारे या भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्या प्रदेश सरचिटणीस आहेत. भटक्या विमुक्त चळवळीत क्रियाशीलही आहेत.त्या भारतभर फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील विचारांच्या प्रचार प्रसारासाठी व्याख्यानांसाठी भ्रमंती करीत असतात. शासकीय नोकरीचा राजीनामा देऊन त्या पूर्णवेळ फुले आंबेडकरी चळवळीच्या प्रचार प्रसारासाठी कार्यरत आहेत.