सुशीलकुमार शिंदेना काँग्रेसमध्ये दिलं जातंय दुय्यम स्थान ?

महाराष्ट्र देशा/प्रशांत झावरे : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी गृहमंत्री, काँग्रेसचे दिग्गज नेते सुशीलकुमार शिंदे यांना आता काँग्रेस पक्षात दुय्यम स्थान दिले जात असल्याचे दिसत आहे. काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षात यंग ब्रिगेड तयार केल्याने कदाचित असे झाले असल्याचा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. परंतु ज्या सुशीलकुमार शिंदे यांनी महाराष्ट्रात काँग्रेससाठी अहोरात्र झटून काम केले त्याच काँग्रेसने व पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी शिंदे यांना दिलेली दुय्यम वागणूक शिंदे व त्यांच्या समर्थकांच्या पचनी पडणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेसचे सरचिटणीस होते, तसेच त्यांच्याकडे हिमाचल प्रदेशची प्रभारी म्हणून जबाबदारी पण होती, त्यांनी पक्षांतर्गत राज्य पातळीवर व देश पातळीवर अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत, परंतु शिंदे यांच्याकडून आता सर्व जबाबदाऱ्या काढून घेतल्या असून त्यांच्या जागी आता माजी खासदार रजनी पाटील यांची वर्णी लागली असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारच मोदींना रोखू शकतात असे विधान सुशीलकुमार शिंदे यांनी केले होते, याच पार्श्वभूमीवर शिंदे यांना पदच्चूत केले असल्याचा जाणकारांचा अंदाज आहे. यामुळेच की काय काँग्रेस पक्षाची सूत्रे संपूर्णपणे राहुल गांधी यांच्याकडे गेल्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांच्यासाठी हा पहिलाच झटका राहुल गांधी यांनी दिला असल्याचे मानले जात आहे.

काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधीं यांनी पक्षात संघटनात्मक बदल करताना नवीन सरचिटणीस नियुक्त केले आहेत तर काही राज्यांच्या प्रभारींची नियुक्ती बदल करून व नवीन पण नियुक्त्या केल्या आहेत, सुशीलकुमार शिंदे यांचे पद काढून घेण्याबरोबरच त्यांचे पक्षाच्या संकेतस्थळावर असणारे नाव व फोटो पण काढून टाकले आहे. यावरून आता राहुल गांधी यांचे राज पक्षात पुर्णपणे चालू झाल्याचे दिसत असून सुशीलकुमार शिंदेंसारख्या नेत्यांना दुय्यम दर्जा देऊन त्यांची काँग्रेस पक्षातील प्रतिष्ठा पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी कमी केली असल्याचे दिसत आहे.