संजय शिंदेंच्या शेतावर सुशीलकुमार शिंदे, सोलापूर जिल्ह्यात चर्चांना उधाण

टीम महाराष्ट्र देशा: सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात गूढ व्यक्तिमत्त्व बनलेले संजय शिंदे आणि त्यांचे फार्महाऊस सध्या चांगलाच भाव खाऊन जात आहे. राज्याच्या राजकारणातील मातब्बर नेते मामांच्या शेतावर येत असल्याने राजकीय पीक देखील जोमाने वाढताना दिसत आहे. आता माजी केंद्रीय सुशीलकुमार शिंदे यांनी संजय शिंदेंच्या फार्महाऊसला भेट दिल्याने सोलापूर जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे.

मंगळवारी सोलापूरहुन पुण्याकडे चाललेल्या सुशीलकुमार शिंदे यांच्या गाडीने संजय मामा यांच्या टेंभुर्णीच्या नागोर्ली येथील फार्महाऊसवर आपला मोर्चा वळवला. आता ही भेट सदिच्छा असल्याचं सांगितलं जातं आहे. मात्र दोन शिंदे एकत्र आल्यावर राजकीय खलबत होणार हे निश्चित आहे. दोन्ही नेत्यांमध्ये सोलापूर आणि माढा लोकसभेच्या समिकरणांवर चर्चा झाल्याचं कळतंय.

मुळ राष्ट्रवादीचे असणारे संजय शिंदे यांनी खा. विजयसिंह मोहिते पाटलांना शह देण्यासाठी जिल्ह्यात आघाडी उघडली आहे. तसेच 2019 मध्ये करमाळयाचा आमदार होणारच असा निश्चिय त्यांनी केला आहे. सध्या कोणत्याही पक्षामध्ये सक्रिय नसणाऱ्या शिंदे यांना आपल्याकडे खेचण्यासाठी सर्वच पक्ष चाचपणी करत आहेत. परंतु तेल लावलेले पैलवान असणारे संजय मामा मात्र कोणाच्या गळाला लागताना दिसत नाहीत.

संजय शिंदे यांच्याप्रमाणे त्यांचे फार्महाऊस देखील चर्चेचा विषय बनत आहे. आजवर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, रामदास कदम यांनी फार्महाऊसला भेट दिलेली आहे.

You might also like
Comments
Loading...