सुशीलकुमार शिंदे यांचे पदयात्रेद्वारे सोलापुरात शक्तिप्रदर्शन

सोलापूर- ( प्रतिनिधी ) – सोलापूर लोकसभेचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पदयात्रेद्वारे शक्तिप्रदर्शन करत सोमवारी रंगपंचमीदिवशी सकाळी आपला उमेदवारी अर्ज भरला. पदयात्रेत पत्नी उज्वलाताई शिंदे, कन्या आमदार प्रणिती शिंदे, जेष्ठ कन्या स्मृती शिंदे – पहाडिया यांच्यासह आघाडीतील राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी व लिंगायत समाजातील बडे नेते सामील झाले होते.

उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुशीलकुमारांनी ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांच्यासह कसबा गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, चार हुतात्मे , अहिल्यादेवी होळकर, मनपा आवारातील इंदिरा गांधी यांना अभिवादन केले. त्यानंतर सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सुशीलकुमारांचे चार हुतात्मा पुतळा येथे आगमन झाले. त्याठिकाणी शिंदे गाडीतून उतरताच त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. त्यानंतर पदयात्रेला सुरुवात झाली.

यावेळी आ. प्रणिती शिंदे म्हणाल्या की, केवळ वडिलांसाठीच नाही तर काँग्रेस पक्ष आणि देशासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहोत. मेक आणि फेक ची हि निवडणूक आहे. आपल्या आयुष्यातील आणि देशाचे अस्तित्व वाचविण्याची हि निवडणूक आहे. देशाला मजबूत करण्यासाठी सर्वांनी काँग्रेसला मतदान केले पाहिजे. लोकशाही आणि हुकूमशाही विरोधातली हि निवडणूक असल्याचे आमदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.