fbpx

पाकड्यांची जिरवली : शिवसेनेचा आनंद गगनात मावेना, हवाई दल आणि मोदींचं केलं तोंडभरून कौतुक

टीम महाराष्ट्र देशा : पुलवामा येथील सीआरपीएफ हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून पाकिस्तानवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती. त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी मध्यरात्री हवाई दलाच्या १२ मिराज विमानांनी पाकव्याप्त कश्मीरात घुसुन जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर १००० किलोच्या बॉम्बने हवाई हल्ले केले. अवघ्या २१ मिनिटात हवाई दलाने जैशचे तळ नेस्तनाबूत केले आहेत.

भारतीय हवाई दलानं केलेल्या या कारवाईनं जैश-ए-मोहम्मदचं कंबरडं मोडलं. जैशचा म्होरक्या मौलाना मसूद अजहरचा मोठा भाऊ इब्राहिम अजहरचा या कारवाईत खात्मा झाला आहे. याशिवाय मसूद अजहरचा मेहुणा युसूफ अजहरदेखील या कारवाईत मारला गेला. पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. वायुदलाने आज एअर स्ट्राईक करून भारतीय नागरिकांच्या दुखावर फुंकर घातली.

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवा हि आग्रही मागणी करणाऱ्या शिवसेनेने आज वायुदलाने केलेल्या भीमपराक्रमानंतर वायुदल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ‘आपण घरात घुसून मारलं आहे. आपल्या सेनेचा खूप अभिमान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 56 इंचाची छाती दाखवून दिली आहे,’ अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे.
भारतीय हवाई दलाच्या 12 मिराज 2000 विमानांनी मध्यरात्री नियंत्रण रेषा ओलांडून दहशतवादी तळांवर हल्ले केले. बालाकोट, मुझफ्फराबाद आणि चकोठी भागात हवाई दलानं 1000 किलोंचे बॉम्ब फेकले. यामध्ये जवळपास 300 दहशतवादी मारले गेले आहेत.