आमदार संग्राम जगताप यांच्यावर लवकरचं शस्त्रक्रिया?

अहमदनगर : केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले नगरचे आमदार संग्राम जगताप यांना गेल्या आठवडाभरापासून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.आ.जगताप यांच्या पोटात दुखत असल्याने औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात गेल्या आठवड्यापासून त्यांच्यावर येथील मेडिसिन विभागात उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर लवकरच शस्रक्रिया करण्यात येणार असल्याचं वृत्त आहे.

केडगाव मनपा पोटनिवडणुकीच्या दिवशी संध्याकाळी सेनेचे शहरप्रमुख संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती, या प्रकरणात सध्या आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात कोणताही सहभाग न आढल्याने त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता. मात्र त्यानंतरही त्यांनी जामीन घेण्यास नकार दिला.

आमदार जगताप यांच्या विरोधात पोलिसांना ठोस पुरावे मिळालेले नाहीत, जोपर्यंत गुन्ह्याचा तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत जामीन न घेण्याची भूमिका त्यांनी घेतली असल्याने आणि जामिनासाठी अर्ज न केल्याने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाली आहे.त्यामुळे त्यांना हर्सुल (औरंगाबाद) कारागृहात रवानगी करण्यात आली होती.

दरम्यान सोमवारी आ. जगताप यांची प्रकृती सुधारण्यासाठी शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात सायंकाळी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी महाआरतीचे आयोजन केले होते. यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.