सुरेश प्रभू यांचा रेल्वे मंत्रिपदाला राम राम ; ट्विटर वरून मानले कर्मचाऱ्यांचे आभार

नवी दिल्ली : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचं मंत्रिपद जाणार हे जवळपास निश्चित झालं आहे. त्याबद्दलचे संकेत प्रभू यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून ट्विट करून दिले आहेत. रेल्वे कर्मचाऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले जात आहेत.

आज मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. १३ मंत्र्यांनी आज शपथ घेतली . काही मंत्र्यांची कॅबिनेट मध्ये बढती झाली आहे तर काही मंत्र्यांनी स्वतः राजीनामे दिले आहेत. या मंत्रिमंडळ विस्तारानंतर बऱ्याच खात्यांची खांदेपालट होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. वारंवार होणाऱ्या रेल्वे अपघातांच्या पार्श्वभूमीवर नुकताच प्रभू यांनी मोदींकडे राजीनामा देखील दिला होता मात्र त्यावेळी प्रभूंना वाट पाहण्याचे सांगण्यात आले होते.

आज सुरेश प्रभू यांनी एक ट्विट केलं आहे. १३ लाखांपेक्षा जास्त रेल्वे कर्मचाऱ्यांचे त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले आहेत. मंत्रिपदाच्या कार्यकाळातील आठवणी नेहमीच माझ्या सोबत राहतील तसेच कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देखील त्यांनी दिल्या आहेत. आगामी काळात मोदी सुरेश प्रभू यांच्याकडे कोणती नवीन जबाबदारी देतात याकडे सर्वांचं लक्ष असेल. तर आता सुरेश प्रभू यांनी रेल्वेमंत्रलयाला राम राम ठोकल्यानंतर लगेचच पियुष गोयल यांच्या नावाची चर्चा  रेल्वेमंत्रिपदासाठी जोरदार चर्चा सुरु झाली आहे.