राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा मराठ्यांना फसविणारा पक्ष : सुरेश पाटील

Maratha samaj warns State govt

पुणे : मराठा समाजाच्या नवीन पक्षाची स्थापना दिवाळीच्या पाडव्याला रायरेश्वर मंदिरात करणार असल्याची घोषणा मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी केली आहे. राज्यात 40 टक्के मराठा समाज आहे. माञ कॉग्रेस आणि राष्ट्रवादीनं मराठा समाजाची फक्त फसवणूक केली, तर भाजप सरकारनं देखील तेच केलं. यामुळं समाज वैफल्यग्रस्त झाला असून, सर्वांनी मिळून पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं.

सुरेशदादा पाटील यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन सर्वपक्षीय नेत्यांवर हल्लाबोल केला. राष्ट्रवादी काँग्रेस हा मराठ्यांची फसवणूक करणारा पक्ष आहे, असा आरोप सुरेशदादा पाटील यांनी केला. ते म्हणाले, राज्यात 40 टक्के मराठा समाज आहे. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सत्तेवर असताना मराठा समाजाची फसवणूक केली. त्यानंतर सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने सुद्धा तेच केले. त्यामुळे मराठा समाज वैफल्यग्रस्त झाला आहे.

मराठा समाजाकडून काढण्यात येणाऱ्या पक्षात कोणीही अध्यक्ष नसणार आहे. या पक्षात शंभर जणांची कोअर कमिटी असणार आहे. या कमिटीत निवृत्त आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे, असे सुरेशदादा पाटील यांनी सांगितले. तसेच, सध्याच्या स्थितीत जवळपास 20 आजी-माजी आमदार समितीच्या संपर्कात असल्याचा दावा करत एमआयएम आणि भारिप सोबत आल्यास आघाडी करण्यास तयार असल्याचेही यावेळी सुरेशदादा पाटील म्हणाले.