ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है : निलेश लंके

अहमदनगर / स्वप्नील भालेराव : शिवसेनेतून बाहेर फेकल्या गेलेल्या निलेश लंके यांनी विधानसभेची तयारी जोरदार चालवली आहे. नाराज शिवसैनिकांचा ताफा सोबत घेऊन पारनेरच्या मैदानात उतरलेल्या लंके यांनी आता सेनेतील नाराजांच्या जोडीने राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील नाराजांना जवळ करण्यास प्रारंभ केल्याचे दिसते. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जाणार्या भाळवणी जिल्हा परिषद गटात सेनेचे प्राबल्य वाढले असले तरी लंके यांनी याच गटातील भाळवणी गणाच्या पंचायत समिती सदस्यांचे पती सुरेश धुरपते यांना ताकद देत त्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाभर काम करण्याचा निर्णय जाहीर केला. याशिवाय शुक्रवारी (दि.१ जून) सायंकाळी सात वाजता जामगाव येथे धुरपते यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शक्तीप्रदर्शन करीत लंके प्रतिष्ठानच्या शाखेचा शुभारंभ केला जाणार आहे. जामगावमध्ये होणार्या या मेळाव्याकडे तालुक्यातील सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.

पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील पंचायत समिती सदस्य सुनंदा धुरपते यांचे पती सुरेश धुरपते हे मोठे प्रस्थ मानले जाते. पंचायत समितीच्या अटीतटीच्या निवडणुकीत धुरपते यांनी माजी सभापती बाबासाहेब तांबे यांच्या पत्नीला पराभूत केले होते. याशिवाय धुरपते यांच्या प्रयत्नातून या गटातून राष्ट्रवादीच्या उमेदवार विजयी झाल्या होत्या. पंचायत समिती सभापती- उपसभापती निवडी दरम्यान राष्टवादीकडून दुखावलेल्या धुरपते यांनी त्याचवेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नेतृत्वावर आगपाखड करीत सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय जाहीर केला होता. बदलत्या राजकारणाचा विचार करता धुरपते यांची राजकीय भूमिका आता तालुक्यात निर्णायक झाली असून निलेश लंके यांना साथ देण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय सेनेसह राष्ट्रवादीला धक्का देणारा मानला जातो. पंचायत समितीमध्ये कॉंग्रेस व राष्ट्रवादीची युती झाल्यानंतर कॉंग्रेसला सभापतिपद, तर राष्ट्रवादीला उपसभापतिपद देण्याचे ठरले होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे युवा नेते व माजी जि. प. उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी सुरेश धुरपते यांच्या पत्नी सुनंदा यांना उपसभापतिपदाचा शब्द देऊनही तो पाळला नसल्याने ते नाराज झाले होते. कुरघोडीच्या व बदनामीच्या राजकारणाला कंटाळून सुरेश धुरपते यांचे लंके यांच्याशी सख्य निर्माण झाले असून हंगे येथील लंकेच्या वाढदिवसाला धुरपते यांनी हजेरी लावत लंके तालुक्याचे आमदार झाले पाहिजेत, अशी जाहीर भूमिका मांडली होती.

शुक्रवार, दि, १ जून रोजी धुरपते यांचा वाढदिवस आहे. या अभिचिष्टचिंतन कार्यक्रमाची सुत्रे लंके यांनी हातात घेतली असून यानिमित्ताने लंके प्रतिष्ठानच्या शाखेचा प्रारंभ होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत हा सोहळा दिमाखदार व संपूर्ण ताकदीने करण्याचे नियोजन धुरपते- लंके यांनी जोडीने हाती घेतले आहे. लंके यांनी सेनेला दिलेल्या दणक्याच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादीला देखील लंके यांनी दणका दिल्याने मोठी राजकीय उलथापालथ होणार असल्याचे मानले जाते. जामगाव या स्वत:च्या होमपिचवर सुरेश धुरपते काय राजकीय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मान सन्मान फक्त निलेश लंकेच देवू शकतात – सुरेश धुरपते

स्वाभिमान गहान ठेवून सामाजिक करणार्यांपैकी आपण नाही. मी कोणासाठी काय केले हे सर्वश्रूत आहे. कोणामुळे कोणाचे राजकारण उभे राहिले आणि जिवंत राहिले हेही सर्वश्रूत आहे. माझी पत्नी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच असली तरी मी स्वत: मात्र निलेश लंके यांच्या सोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. तालुका आणि मतदारसंघातील जनता बदलाच्या शोधात आहे. हा शोध निलेश लंके यांच्या निमित्ताने संपला असून निलेश लंके यांना आमदार झाल्याचे पाहण्याचे सर्वांचेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी व माझ्या सहकार्यांनी काम करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेसह राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांकडून कार्यकर्त्यांचा फक्त वापर केला जातो. या दोन्ही पक्षातील नेत्यांची हुकुमशाही आणि फिक्सींगमधील राजकारण आता तालुक्याने हेरले आहे. या दोघांशिवाय सामान्य घरातील मुलगा आमदार होऊ शकतो हे दाखवून देण्याची योग्य वेळ आली असून या संधीचे सोने करणार असल्याची प्रतिक्रिया सुरेश धुरपते यांनी दिली.

ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है – निलेश लंके

हुकुमशाही आणि हिटलरी नेतृत्वाचा अस्त करण्यास आता तालुक्यातील सामान्य जनता आणि तरुण सज्ज झाला असून चारचौघांमध्ये पानउतारा करणाऱ्यांचा ‘उतारा’ गावागावात तयार होऊ लागला आहे. सुरेश धुरपते यांनी माझ्यासोबत काम करण्याचा घेतलेला निर्णय हा पूर्ण विचारांती आहे. धुरपते यांच्या सक्रिय होण्यामुळे आम्हाला मोठे बळ मिळाले असून हे बळ आमच्या कार्यकर्त्यांना लढण्याची ऊर्जा देणार असल्याचे प्रतिपादन निलेश लंके यांनी केले. तालुक्यात प्रस्थापितांनी कायमच तरुणांचा वापर केला. औटी- झावरे यांनी कार्यकर्ते दावणीला बांधल्यागत आपलेच असल्याच्या अर्विभावात कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. आता हेच कार्यकर्ते गावागावात पेटून उठलेत आणि त्यांना मी पर्याय वाटू लागलोय यात माझी काय चूक! अहोरात्र पळतोय आणि काम करतोय हीच माझी चूक असेल तर ही चूक मी हजारवेळा करण्यास तयार आहे. आतापर्यंत जे काही दिसतंय तो फक्त ट्रेलर आहे. पुर्ण पिक्चर अद्याप बाकी आहे, असा सुचक इशाराही लंके यांनी दिला.