fbpx

मागून आलेल्या पोपटामुळे आम्हाला पक्ष सोडावा लागला : सुरेश धस

suresh dhas vs munde

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड लोकसभा मतदार संघामध्ये मुंडे बंधू – भगिनींची चांगलीच शाब्दिक जुगलबंदी पाहायला मिळत आहे. तर आता या जुगलबंदी मध्ये विधान परिषदेचे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आता उडी मारली आहे. बीड मधील एका भाषणात शेवटी आलेल्या पोपटाची रंजक कथा सांगून अप्रत्यक्षरित्या राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला.

यावेळी सुरेश धस म्हणाले की, सर्वांच्या मागून आलेला पोपट राजाच्या कानात मिठू मिठू बोलत आहे,तसेच राजाला देखील त्याचं पोपटाचं खरं वाटायला लागलं आहे. त्यामुळे आम्हाला पक्ष सोडवा लागला. यावेळी सुरेश धस यांनी आपल्या मिश्कील भाषणाने अप्रत्यक्षरित्या धनंजय मुंडे यांना लक्ष करत एका पोपटाची कथा सांगितली. धस म्हणाले की, ‘एका राजाला पशु-पक्ष्यांचा छंद होता. सर्वांना राजाकडून सारखी माया लावली जात होती. पण शेवटी आलेल्या पोपटावर राजाचा खूपच जीव जडला. पोपट राजाच्या कानात मिठू मिठू बोलत होता. राजालाही फक्त त्याचंच खरं वाटायला लागलं आहे त्यामुळे बाकीच्या प्राण्यांकडे दुर्लक्ष झाल.तसेच जयदत्त क्षीरसागर यांच्या घरात वाद लावल्याचा आरोप देखील धस यांनी अप्रत्यक्षरीत्या धनंजय मुंडेंवर केला.

दरम्यान बीड लोकसभा मतदार संघातून भाजपने प्रीतम मुंडे यांना पुन्हा तिकीट दिलं आहे. तर त्यांना टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादीने बजरंग सोनावणे यांना त्यांच्याविरोधात उमेदवारी दिली आहे. मात्र राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी प्रीतम मुंडेंना पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघात चांगलीच रंगतदार लढत पाहिला मिळणार आहे.