किती बल्लालदेव, कालकेय आले तरी बाहुबली हरणार नाही; सुरेश धसांचा मुंडेना टोला

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील शेवटचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात विरोधक सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका करत आहेत. तर सत्ताधारी पण विरोधकांना त्यांच्याच भाषेत सडेतोड उत्तर देत आहेत. असेच काहीसे काल विधानपरिषदेत पाहिला मिळाले.

राज्यपालांच्या अभिभाषणाला विरोध करताना धनंजय मुंडे यांनी ‘3 इडीयट्स’, ‘शोले’, ‘रामगड के शोले’, ‘ऑल इज वेल’ या चित्रपटांचा उल्लेख करत सरकारवर टीका केली. यावर बोलताना सुरेश धस यांनी ‘शोले’ तर आमचा आहेच, परंतु विरोधी पक्षांचा ‘रामगड के शोले’ झाला असल्याच म्हणत विरोधकांना चांगलेच फटकारले आहे.

यावेळी धस म्हणाले की, राष्ट्रवादीची अवस्था ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटासाखी झाली आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, जया भादुरी, ऋतिक रोशन हे मल्टिस्टार होते, परंतु चित्रपट मात्र फ्लॉप झाला होता. राष्ट्रवादीची अवस्था अशीच झाली आहे. नावं खूप मोठी पण चित्रपट फ्लॉप आहे. तसेच राज्यात सध्या बाहुबली चित्रपटाची चलती आहे. नरेंद्र बाहुबली, देवेंद्र बाहुबली या बाहुबलींचे सरकार व्यवस्थित काम करत आहेत. यात किती बल्लालदेव, कालकेय आले तरी बाहुबली हरणार नाही, असा फिल्मी टोला त्यांनी यावेळी लगावला.