सुरेश धस यांची भाजपमध्ये घरवापसी निश्‍चित

बीड : बीड जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसात वादळ निर्माण करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे निलंबित नेते माजी मंत्री सुरेश धस यांची भाजपमध्ये घरवापसी लवकरच होणार अशी चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत. भाजप नेत्या आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आष्टीत सुरेश धस यांच्या निवासस्थानी भेट देऊन चर्चा केल्यामुळे अनेक दिवसांपासून चाललेला हा विषय आता लवकरच पूर्ण होणार अशी शक्यता वर्तविली जात आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या रूपाने भाजप आणि राष्ट्रवादी वादात अतिशय प्रतिष्ठेच्या ठरलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिल्यामुळे सुरेश धस यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपकडे जाण्याचा ओघ केवळ धस यांच्या पुरता मर्यादित राहणार की आणखी काही मंडळी ही वाट चोखळणार अशी उत्सुकताही निर्माण झाली आहे. बीड जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे यांची जादूची कांडी प्रसिद्ध होती. ही कांडी फिरताच काही मंडळी उघडपणे तर काही मंडळी आपापल्या पक्षात राहून भारतीय जनता पक्षाला मदत करत असत. तोच खाक्या आता पंकजाताई मुंडे यांनी चालू ठेवत जिल्हा परिषदेत भाजपचे कमळ फुलविले. आता आणखी दोन ज्येष्ठ नेते भाजपसोबत काम करायला इच्छूक असल्याचा गौप्यस्फोट पंकजा मुंडे यांनी केला आहे. मराठवाड्यात गोपीनाथ मुंडे यांच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना मुंडे यांच्यापासून फोडत प्रतिष्ठित करण्याचा जो डाव खेळला तो पंकजा मुंडे यांनी आपल्या मुत्सद्देगिरीने हाणून पाडण्यात ब-यापैकी यश मिळविले असल्याचे चित्र दिसत आहे.