fbpx

पुण्यात बापटांविरुद्ध ‘पुणेकर’ नटरंगी नार ?

टीम महाराष्ट्र देशा : उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख जवळ आली तरी आघाडी कडून पुणे मतदार संघासाठी उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे आता पुण्यातून आघाडीकडून कोणता उमेदवार जाहीर होणार याकडे समस्त पुणेकरांचे लक्ष लागून राहिले आहे. तर पुणे मतदार संघासाठी रोज नवीन नावं पुढे येत असून आज तर या जागेवर लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी हक्क सांगितला आहे. आज त्यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

यावेळी सुरेखा पुणेकर म्हणाल्या की, दिल्लीत जाऊन मी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केली आहे. ते मला या उमेदवारी बाबत कळवणार आहेत. पण मी कुणाला भेटले ते सांगणार नाही. त्यामुळे आता पुण्याच्या उमेदवारीवर सुरेखा पुणेकर यांची वर्णी लागणार आहे की काय अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

दरम्यान काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांचं नाव काँग्रेसने निश्चित केलंय पण त्याच्या नावाची अधिकृत घोषणा अजुन झालेली नाही. गेली काही दिवस काँग्रेसचा उमेदवार कोण याचीच चर्चा सुरू होती. दिल्लीतल्या श्रेष्ठींनी आपलं मत शिंदे यांच्या पारड्यात टाकल्याने त्यांची उमेदवारी पक्की झाली अशी माहिती सूत्रांनी दिली होती. तसेच युतीकडून भाजपचे पालकमंत्री गिरीश बापट यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. त्यामुळे गिरीश बापट यांना आघाडीचा कोणता उमेदवार टक्कर देणार आहे. हे पाहण्यासाठी पुणेकर आतुर झाले आहेत.