भाऊसाहेब रंगारी मंडळाने मानले पुणे महापालिकेचे आभार

पुणे : गेल्या काही वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव कोणी सुरु केला यावरून पुण्यात मोठा वाद निर्माण झाला होता. पुणे महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजपच्या वतीने गतवर्षी सार्वजनिक गणेशोत्सवाचे १२५ वे वर्ष साजरे करण्यात आले होते. त्याला भाऊसाहेब रंगारी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप देखील नोंदवला होता. अखेर पुणे महानगरपालिकेने भाऊसाहेब रंगारी यांनी पुण्यात गणेशोत्सव सुरु केला असल्याचे मान्य केले आहे. पुणे महापालिकेच्या वेबसाईटवर नव्याने माहिती अपडेट करण्यात आली आहे.

भाऊसाहेब रंगारी मंडळाचे विश्वस्त सूरज रेणुसे यांनी याबद्दल प्रशासनाचे आभार मानले आहेत. भाऊसाहेब रंगारी यांनी १८९२ साली सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केल्याचे अनेक कागदपत्रातून स्पष्ट झाले आहे, तरी देखील सत्ताधारी पक्ष मान्य करण्यास तयार नव्हता. पुणे महापालिका आणि सताधारी भाजपच्या निर्णयाविरोधात त्यांनी उपोषण केले आणि न्यायालयात धाव देखील घ्यावी लागली. मात्र अखेर आज महापालिकेच्या वेबसाईटवर भाऊसाहेब रंगारी यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केल्याचा उल्लेख असल्याने आम्ही प्रशासनाचे आभार मानतो असे त्यांनी म्हटले आहे.

मागच्या काही वर्षांपासून पुण्यामध्ये गणेशोत्सवाची सुरुवात नेमकी कोणी केली? यावरून मोठा वाद सुरु होता. या वादावर सध्या पडदा पडला असला तरी महापालिकेने जी नवीन माहिती अपडेट केली आहे. त्यावरून देखील यावर्षीही नव्याने वाद उभा राहण्याची शक्यता आहे.

गणेशोत्सवाच्या वादाची मालिका सुरूच ; महापालिकेचा सन्मान न स्वीकारताच भाऊ रंगारी गणपती विसर्जित