‘सीबीआयवर आमचा विश्वास नाही,मुंडेंच्या मृत्यूची चौकशी ‘रॉ’कडून करा’

supriya sule

पुणे : गोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून झाल्याचा खळबळजनक दावा सय्यद शुजा या अमेरिकास्थित हॅकरने केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलच ढवळून निघाले आहे. त्यानं लाइव्ह प्रेस कॉन्फरन्स घेतली असून अनेक खळबळजनक दावे केले आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुका या आधीच फिक्स केल्या होत्या असा आरोप त्यानं केला आहे.युरोपमध्ये इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन (IJA) कडून एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे. यानिमित्ताने अमेरिकन सायबर एक्स्पर्टला बोलवण्यात आलं होतं.

दरम्यान,याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पारदर्शक चौकशीची गरज व्यक्त केली आहे. तर दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणाची भारतीय गुप्तचर यंत्रणा अर्थात रॉ कडून चौकशीची मागणीही करण्यात आली आहे. सीबीआयवर आमचा विश्वास नसून सरकारनं सीबीआयचं कंबरडं मोडल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. शिवाय आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी त्यांनी केली.

अमेरिकास्थित हॅकरचा आरोप काय?

अमेरिकास्थित हॅकर सईद शूजा असं या एक्स्पर्टचं नाव आहे, त्याने लंडनमध्ये दावा केला आहे की, 2014 च्या निवडणुकीत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना ईव्हीएम हॅकिंग माहित होतं, त्यामुळेच त्यांची हत्या झाली. लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅक केलं होतं. 14 लोकांच्या टीमने हे काम केलं होतं. त्यापैकी काहींची हत्या झाल्याचाही दावा अमेरिकेच्या एक्स्पर्टने लंडनमध्ये केला आहे. तर दिल्ली निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या सांगण्यावरुन हॅक केलं असल्याचाही दावा करण्यात आला.

निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

भारतीय निवडणूक आयोगाने या हॅकरने केलेला दावा फेटाळून लावला आहे. निवडणूक आयोग या प्रकरणात पडू इच्छित नाही. भारतातील EVM सुरक्षित आहेत, त्यांमध्ये छेडछाड होऊ शकत नाही, या दाव्यावर आम्ही कायम आहोत. भारतात वापरल्या जाणाऱया EVM मशीन भारत इलेक्ट्रॉनिक अँड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कडून अत्यंत कठोर निरीक्षणाखाली तयार केल्या जातात. 2010 साली नियुक्त करण्यात आलेल्या तांत्रिक तज्ज्ञांच्या समितीच्या देखरेखीखाली हे काम पूर्ण केले जाते असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.