fbpx

बारामतीत सुनेत्रा पवारांची भाची की नणंद कोण होणार विजयी ? नात्यातील रंगत लढाईकडे राज्याचे लक्ष

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील हायव्होल्टेज लढाई म्हणून बारामतीकडे पाहिलं जात आहे. कारण शरद पवारांचा बालेकिल्ला बारामती मतदारसंघात यंदा राष्ट्रवादीच्या खासदार, आणि पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्यासमोर राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना भाजपने तिकीट दिले आहे. विशेष म्हणजे या दोघीही बारामतीच्याच ‘लेकी’ आहेत. यामध्ये विशेष बाब म्हणजे अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा या लढाईत महत्वाचा ‘रोल’ असणार आहे. कारण राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या वाहिनी तर भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांच्या आत्या असणाऱ्या सुनेत्रा पवार यांची भूमिका या लढाईमध्ये महत्वाची असणार आहे.

पवार कुटुंबातील तिसऱ्या पिढीच्या वारसदार असणाऱ्या सुप्रिया सुळे यांना २००६ मध्ये राज्यसभा आणि २००९ पासून दोन वेळेस लोकसभा असा दिल्लीतील राजकारणाचा तगडा अनुभव आहे. दिल्लीत अभ्यासपूर्ण भाषणे आणि संसदरत्न पुरस्काराने नावजलेल्या सुप्रिया सुळे याचं पारड जड वाटत असताना, दुसरीकडे कांचन कुल यांना माहेर आणि सासर या दोन्ही कुटुंबांमधून राजकीय वारसा मिळालेला. निंबाळकरांची कन्या आणि कुल यांची सून ही दोन्ही चलनी नाणी त्यांच्या बाजूने दिसतात. पहिले भाषण लेखी वाचून दाखवण्याची वेळ आली तरी ‘कुल कुटुंबाकडून झालेली लोकसेवा’ आणि ‘मोदींची देशसेवा’ हे दोन हुकमी पत्ते त्या आपल्या प्रचारसभांत मोठ्या खुबीने वापरत आहेत.

एकीकडे एकछत्री कारभार, घराणेशाही हे मुद्दे सुप्रिया सुळे यांना अडचणीचे ठरू शकतात. विकासाचे मोठे-मोठे दावे केले जात असले तरी मतदारसंघातील अनेक गावे आजही पाणी व रस्त्यांसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित. त्यामुळे मतदारांत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कधी नव्हे तो यंदा कमालीचा रोष पाहायला मिळत आहे. २००४ ते २००९ यादरम्यान गमावलेल्या अडीच लाख मतांची कमी हे नेतृत्वाच्या नाराजीचे कारण मानले जाते. शरद पवारांसारखी माणसे जोडण्याची, वैयक्तिक नाते जपण्याची कला अवगत नसणे आणि पक्ष कार्यकर्त्यांची स्वतंत्र फळी निर्माण करण्याच्या गुणाचाही अभाव सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्व जाणवत आला आहे.

कुटुंबाचे संचित असले तरी नवखा चेहरा ही सर्वात मोठी उणीव कांचन कुल यांच्यामध्ये सुरवातीला दिसत आहे. कांचन कुल निंबाळकर आणि कुल या दोन्ही सासर , माहेरच्या राजकीय घराण्यांचा वारसा सांगत असल्या तरी आतापर्यंत सक्रिय राजकारणापासून दूर असलेल्या कांचन याच निवडणुकीत नेतृत्व आणि वक्तृत्वाचे पाठ गिरवत आहेत. आतापर्यंत कोणत्याच पक्ष, संघटनेच्या सदस्याही नसलेल्या कांचन राजकारणात पूर्णपणे नवख्या आणि मतदारसंघात पतीच्या व पक्षाच्या कृपेवर प्रचार करत आहेत.

त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या तुलनेत कांचन कुल या नवख्या वाटत असल्या तरी जमेच्या बाजू आणि उणीवा दोन्ही बाजूने असल्याने लढत मात्र लक्षवेधी ठरणार आहे यात शंका नाही. दुसरीकडे सुनेत्रा पवार यांच्याच नात्यातील दोन्ही उमेदवार असल्याने देखील या लढाईकडे राज्याचे लक्ष लागले आहे.