सुप्रियाताई विरुद्ध कांचनताई : निकालासाठी उरले फक्त चार दिवस

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. १९८४ पासून बारामती मतदारसंघावर पवारांचं वर्चस्व होत पण २०१४च्या लोकसभा निवडणुकीत मात्र पवारांच्या बालेकील्याला धक्का बसला. महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध जोरदार टक्कर दिली. २०१४ च्या निवडणुकीत सुप्रिया सुळे फक्त ६९७११ मतांनी विजयी झाल्या. त्यामुळे २०१९ साठी भाजपानेप्रमाणात कंबर कसली आहे. रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल या सुप्रिया सुळे यांना टक्कर देणार आहेत. २०१४ ला जानकर यांनी कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढण्यास नकार दिला होता. त्याचाही फटका भाजपला बसला होता. त्यामुळे कांचन कुल यावेळी भाजपच्या कमळावर निवडणूक लढतील.

यंदा कमळ फुलणार का ?

बारामती लोकसभा मतदारसंघात बारामती, खडकवासला, इंदापूर, पुरंदर, भोर,दौंड असे सहा मतदारसंघ येतात. बारामती विधानसभा हा पवारांचाच मतदारसंघ आहे. पण यावेळी बारामती मधून देखील सुप्रिया सुळे यांना मताधिक्यात फरक पडू शकतो. कारण कांचन कुल यांचे माहेर हे पण बारामती मतदारसंघातच येते. त्यामुळे सुप्रिया सुळे आणि कांचन कुल या दोघेही बारामतीच्याच लेकी आहेत. त्यामुळे बारामती कोणत्या लेकीला साथ देणार ? हे देखील पाहण महत्वाच ठरणार आहे.

खडकवासला विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जायचा पण आता परिस्थिती बदलली आहे. २०१४ च्या लोकसभेच्या वेळी खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपचा फक्त एक नगरसेवक होता आज खडकवासल्यात भाजपचे तब्बल १८ नगरसेवक आहेत. सोबत आमदार देखील भाजपचे आहेत. त्यामुळे खडकवासला मतदारसंघ सुप्रिया सुळे यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकतो. याचाच विचार करून भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांनी देखील खडकवासल्यावर लक्ष केंद्रित केले होते.

पुरंदर आणि इंदापूर, भोर या तीन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे मित्रपक्ष असलेल्या कॉंग्रेसचे प्राबल्य आहे. पण कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील स्थानिक पातळीचा वाद सुप्रिया सुळे यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकतो. राष्ट्रवादी कॉंग्रेसला लोकसभेला मदत केली तर राष्ट्रवादी कडून विधानसभेला धोका होवू शकतो अस स्थानिक कॉंग्रेस पदाधिकाऱ्याचे मत आहे. आघाडीतील हे वाद मिटवण्यासाठी राष्ट्रवादी कडून प्रयत्न केले गेले पण याला कितपत यश येईल, हे मात्र निकालानंतरचं स्पष्ट होईल.

भोर-वेल्हा – मुळशी मधून संग्राम थोपटे आमदार आहेत. थोपटे यांना पवारांचा छुपा विरोध असल्याने आणि वैयक्तिक पातळीवर संग्राम थोपटे राहुल कुल यांचे जवळचे मित्र आहेत. त्यामुळे आजवर त्यांनी एकमेकांना सहकार्य केलेलेच आहे. याही निवडणुकीत ते करतील अशी शक्यता आहे. इंदापूर मधून हर्षवर्धन पाटील विधानसभा लढतील, पवारच्या आजवरच्या राजकारणात कायम दगा-फटका झाल्याने हर्षवर्धन पाटील यांनी सुद्धा सावध भूमिका घेतली आहे.

पुरंदर मधून सध्या शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे आमदार आहेत. कॉंग्रेसकडून विधानसभेला संजय जगताप इच्छुक आहेत. पण त्यांना राष्ट्रवादी कडून कोणतही ठोस आश्वासन दिले गेले नाही. त्यामुळे संजय जगताप काय पवित्रा घेतात, हे देखील महत्वाचे आहे. पवारांच्या आजपर्यंतच्या बेभरवशी राजकारणाचा सुप्रिया सुळे यांचा तोटाच होणार आहे. परिणामी त्याचा फायदा कांचन कुल यांना होईल. दौंड विधानसभा मतदारसंघात स्वतः राहुल कुल आमदार आहेत. त्यात स्थानिक उमेदवार म्हणून कांचन कुल यांना दौंड साथ देणारच. त्यात बारामती कडून दौंड वर कायम अन्यायच केला गेला आहे. अशी भावना दौंडकरांच्या मनात आहे.

त्यामुळे “स्वाभिमानी दौंडकर” हि कुल यांची घोषणा नक्कीच फायदेशीर ठरणार. दौंड मतदारसंघात याआधी राहुल कुल याचे वडील सुभाष कुल आमदार होते, त्याआधी ते जिल्हा परिषद सदस्य सुद्धा होते. सुभाष कुल यांच्या निधनानंतर राहुल कुल यांच्या मातोश्री रंजना कुल यादेखील दौंड विधानसभा मतदारसंघातून आमदार होत्या. तर सध्या राहुल कुल आमदार आहेत. त्यापूर्वी राहुल कुल यांचे आजोबा बाबुराव कुल हेसुद्धा दौंड पंचायत समितीचे सभापती होते. त्यामुळे कुल घराणे पुणे जिल्हाच्या राजकारणात कायम सक्रीय राहिलेले आहेत. तर जिल्हातील सर्वच पक्षातील नेत्यांचे कुल घराण्याचे चांगले सबंध आहेत. याचा नक्कीच फायदा कांचन कुल यांना होणार. त्यामुळे सुप्रिया सुळे यांचा पराभव करून कांचन कुल जायंट किलर ठरणार का ?