सुप्रिया सुळे, सुनील तटकरे रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा करणार

पक्ष वाढीच्या दृष्टीने महत्वाचा दौरा

रत्नागिरी : जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला उभारी देण्यासाठी पक्षाचे नेते या महिन्यात जिल्हा दौर्‍यावर येणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे १५ नोव्हेंबरला सावर्डे येथे, तर १९ नोव्हेंबरला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे चिपळूण दौर्‍यावर येणार आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी हे नेते जिल्हा दौ-यावर येणार आहेत. यानिमित्त विविध ठिकाणी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीत चिपळूण मतदारसंघात राष्ट्रवादीचा पराभव झाला. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळाले नाही. माजी आमदार रमेश कदम पक्षातून बाहेर पडल्यामुळे पक्षाची मोठी हानी झाली. सध्या कोणतेही सत्ताकेंद्र हाती नसताना राष्ट्रवादी काँग्रेसने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चांगले यश मिळाले. यानिमित्ताने कार्यकर्त्यांमध्ये आणखी उत्साह वाढविण्यासाठी पक्षाचे वरिष्ठ नेते चिपळूणला येणार आहेत.

कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणुक पुढील वर्षी होणार आहे. याबाबत युवकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत १५ नोव्हेंबरला सावर्डे येथे मेळावा घेण्यात येणार आहे. त्यानंतर १९ नोव्हेंबरला तटकरे चिपळूण दौ-यावर येणार आहेत. शिरगाव ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने वर्चस्व मिळविल्याबद्दल येथील ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांचा सत्कार तटकरे यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर ते कामथे ग्रामपंचायतीला भेट देतील. पक्षाचे जिल्हा प्रभारी भास्कर जाधव, आमदार संजय कदम, जिल्हाध्यक्ष शेखर निकम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राकेश चाळके आदी उपस्थित राहणार आहेत.