पंतप्रधान मोदींचा एकेरी उल्लेख करणाऱ्या विद्यार्थीनीचा सुप्रिया सुळेंनी घेतला ‘क्लास’

औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख करणाऱ्या विद्यार्थीनीला खासदार सुप्रिया सुळे यांनी चांगलच सुनावले आहे. झाल असं कि, एका विद्यार्थीनीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून ‘मोदींनी देश कॅशलेस केला, पण कास्टलेस कधी करणार’ असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी ‘नरेंद्र मोदी हे सामान्य व्यक्ती नसून देशाचे पंतप्रधान आहेत, पहिले त्यांचा आदर करायला शिका, आम्ही विरोधक असलो तरी पंतप्रधान म्हणून त्यांच्या बद्दल आदर आहे. सगळ्यांना तो असायलाच हवा असा सल्ला दिला. स्त्रीभ्रूण हत्या, हुंडाबळी, छेडछाड, अत्याचार, तरुणांमध्ये वाढणारी व्यसनाधीनता अशा अनेक समस्यां विरोधात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या वतीने जागर युवा संवाद यात्रा काढण्यात आली आहे. ही जागर युवा संवाद यात्रा आज औरंगाबाद येथे पोहोचली. यावेळी देवगिरी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात हा सर्व प्रसंग घडला.

विद्यार्थांना संबोधित करताना यावेळी सुप्रिया सुळे यांनी अनेक विषयांना हात घातला. यावेळी राज्यभरात ऐरणीवर आलेल्या अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावर भाष्य करत ‘इतर राज्यात अंगणवाडी सेविकांना चांगला पगार  मिळतो. परंतु आपले सरकार त्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे, आंगणवाडी सेविकांच्या या लढ्याला आमचा पाठींबा आहे. आम्ही त्यांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करू.असे सांगितले.

यावेळी विद्यार्थ्यांनी आंतरजातीय विवाहाचा मुद्दाही उपस्थित केला. ‘खरंतर लोकांचे विचार बदलायला हवेत. आजही लोक आंतरजातीय विवाहाला विरोध करतात. आपले राज्य हे पुरोगामी विचारांचे राज्य आहे. आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला विरोध व्हायला नको असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.