‘केंद्र सरकार संविधान बदलू पाहतंय, भाजपला कडाडून विरोध करा’

‘केंद्र सरकार संविधान बदलू पाहतंय, भाजपला कडाडून विरोध करा’

मुंबई : आजचा दिवस म्हणजेच २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस (Constitution Day) म्हणून देशभरात साजरा केला जातो. केंद्र सरकारडून संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आज संविधान दिन साजरा केला जाणार आहे. मात्र काँग्रेससहित सर्वच विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. भारतीय संविधान दिनानिमित्ताने मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाने प्रदेश कार्यालयात संविधान गौरव दिन विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सुप्रिया सुळे बोलत होत्या. सुप्रिया सुळे यांनी भाजपला कडाडून विरोध करण्याचे आवाहन केले आहे.

संविधान हे जात नाही किंवा धर्म नाही किंवा प्रांत नाही. तो एक ग्रंथरूपातला कष्टपूर्वक घडवलेला मार्गदर्शक आहे. पण आता केंद्रातले सत्ताधारी हे संविधान बदलू पहात आहेत. त्यांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रयत्न याच दिशेने सुरू आहेत. आज आपली जी काही ओळख आहे ती संविधानामुळे आहे. त्यामुळे संविधानात जर कुणी बदल करत असेल तर त्याचा कडाडून विरोध आपल्याला करायला हवा, असं सांगतानाच संविधान वाचलं तरच देश वाचेल. त्यामुळे आपण संपूर्ण राज्यभर संविधानाच्या संरक्षणासाठी उभं राहिलं पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

अगदी मोठं आंदोलन जरी प्रत्येकाला शक्य झालं नाही, तरी आपल्या पातळीवर आपण छोट्या छोट्या गोष्टी करून संविधानाबद्दलच्या जाणिवांबाबत जागर करू शकतो. संविधानाने मला काय दिलं यावर एक निबंध स्पर्धा आपण घेऊ शकतो. आपण व्हॉट्सअप वापरतो. त्यात दर आठवड्याला आपण संविधानाचा एखादा सुविचार फॉरवर्ड करू शकतो, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

राष्ट्रवादी मासिकात दर महिन्याला आपण संविधानवर एक पान देण्याचा प्रयत्न करू. अकॅडेमिकली महाराष्ट्र सरकार संविधानासाठी काय करू शकेल यावर कार्यक्रम असायला हवा. पुढील पिढ्यांमध्ये संविधानाचे महत्त्व वाढत राहील याची काळजी आपणच घ्यायला हवी. संविधानाच्या बळकटीसाठीच आपण आपली संघटना वाढवत राहूया, आणि त्याद्वारे सामाजिक बांधिलकी जपत राहूया, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या: