fbpx

श्वासात श्वास आहे तोपर्यंत महिलांच्या डोक्यावरचा कळसा घालवून नळाला पाणी आणायचे आहे : खा. सुळे

टीम महाराष्ट्र देशा- आज औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पैठण येथे महिला मेळाव्यास मार्गदर्शन केले. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान याही उपस्थित होत्या.या ठिकाणी बोलताना सुप्रिया सुळे यांनी जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत महिलांच्या डोक्यावरचा कळसा घालवायचा आहे. त्यांच्या नळाला पाणी आणायचे आहे, असा निर्धार सांगितला. सत्ता लाल दिवा घेऊन मिरवण्यासाठी नाही तर सर्वसामान्य माणासाच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी हवी, असेही त्या म्हणाल्या.

चार वर्षांपूर्वी मोठ्या विश्वासाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांना जनतेने सत्ता दिली पण एकही काम झाले नाही. या सरकारचा एकही निर्णय ठोस नाही. कर्जमाफी दिली पण ती अजूनही लोकांपर्यंत पोहोचली नाही, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. २००९ साली शरद पवार साहेबांनी सर्वात मोठी कर्जमाफी दिली होती. तेव्हा लोकांना घरबसल्या कर्जमाफी मिळाली होती, हेही त्यांनी नमूद केले.

काल पेट्रोलवर ५ रुपये कमी केले असे सरकारने सांगितले मात्र पेट्रोल पंपावर फक्त ४ रुपयांनी पेट्रोल कमी झाले आहे. अशी या सरकारची खोटी वागणूक आहे. सरकारने नोटाबंदी केली पण त्यातून काय साध्य झाले? नव्या नोटांसाठी जेवढा खर्च केला तेवढ्या खर्चात एसटीची सुविधा नीट झाली असती, ग्रामीण भागात पाण्याची व्यवस्था झाली असती, ग्रामीण भागातील रस्ते नीट झाले असते, गरीब जनतेला रेशन मिळाले असते, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरकार आले तर अांगणवाडी सेविकांचे प्रश्न आधी मार्गी लावू, एसटीची सुविधा नीट करू, बचत गटांकडेही लक्ष घालू, असे आश्वासन सुप्रियाताईंनी यावेळी दिले.

माजी आमदार संजय वाघचौरे यांनी यावेळी शिवसेना आम्हाला १५ वर्षांचा हिशोब विचारतेय. शिवसेनेने चार वर्षांत एक पिठाची गिरणी तरी सुरू केली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. पश्चिम बंगाल येथे जनता ममता बॅनर्जी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे तसेच आपणही आपल्या शरद पवार साहेबांसोबत खंबीरपणे उभे रहायला हवे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.या मेळाव्यास माजी महिला जिल्हाध्यक्ष अनुपमा पाथ्रीकर, प्रदेश उपाध्यक्ष कदीर मौलाना आणि पक्षाचे अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

रविना टंडनचे वक्तव्य सरकारचे लांगुलचालन करणारे – सुप्रिया सुळे