Share

Supriya Sule | “साहेबांनी कर्नाटक पोलिसांच्या लाठ्या झेलल्या पण…”, सुप्रिया सुळेंनी सांगितली ‘ती’ आठवण

Supriya Sule | मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून सध्या राज्यातील राजकारण तापलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. या घटनेला आता सात दशकांहून जास्त काळ उलटला. मात्र, कर्नाटकसोबत असलेला सीमाप्रश्न अजूनही सुटलेला नाही. सीमाभागातील अनेक गावांना महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा असल्याचा दावा सातत्याने महाराष्ट्राकडून केला जात आहे. बेळगावमध्ये यावरून मोठा संघर्ष पाहायला मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या ऐंशीच्या दशकातील आंदोलनाची आठवण करून देत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी फेसबुक पोस्ट शेअर केली आहे.

काय म्हटलंय पोस्टमध्ये?

कर्नाटक-महाराष्ट्रादरम्यान पुन्हा एकदा सीमावाद सुरु झाला असताना महाराष्ट्रातील मंत्र्यांचा बेळगाव दौरा कर्नाटकच्या तंबीनंतर रद्द करण्यात आला. ही बातमी वाचली आणि मला आदरणीय पवार साहेबांच्या ऐंशीच्या दशकातील आंदोलनाची आठवण झाली.

साहेबांनी कर्नाटक पोलीसांच्या लाठ्या झेलल्या पण माघार घेतली नाही. खुद्द एस एम जोशी देखील साहेबांच्या पाठीवर उमेटलेले वळ पाहून हळहळले होते. तो काळच तसा होता. सीमाभागात राहणाऱ्या जनतेवर कन्नड भाषेची सक्ती करण्यात येत होती. कर्नाटक सरकारने शालेय अभ्यासक्रमात कन्नड अनिवार्य केल्याची घोषणा केली. याविरोधात मोठं आंदोलन उभं करण्याचा निर्णय समितीने घेतला.
खुद्द एस एम जोशी यांनी १९८६ मध्ये आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.

याअंतर्गत तीन दिवसांच्या साखळी आंदोलनाचं नियोजन केलं. महाराष्ट्रातले नेते बेळगावमध्ये जावून भर चौकात निषेध नोंदवतील, असं ठरविलं. अर्थातच याला कर्नाटक सरकारने विरोध केला आणि महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेशबंदी केली.

पहिल्या दिवशीच्या आंदोलनाचं नेतृत्व आदरणीय पवार साहेबांकडे होते.बेळगावात दाखल होण्यासाठी साहेबांनी एक शक्कल लढविली. ते कोल्हापुरात गेले. तिथून एक फियाट गाडी घेतली. सोबत बाबासाहेब कुपेकर आणि एक ड्रायव्हर घेतला. साहेबांनी स्वतः ड्रायव्हर असल्याची बतावणी केली. खऱ्या ड्रायव्हरला मागे मालकाच्या जागी बसवलं. तिघे जण निघाले. चेकपोस्टवर पोलिसांनी चौकशी केली परंतु त्यांना काहीच कळलं नाही.साहेब बेळगावात पोहोचले पण कुणालाही थांगपत्ता लागला नव्हता.

बेळगावात जमावबंदी होती. साहेब पूर्वीच पोहोचले असल्यामुळे अरविंद गोगटेंच्या घरी त्यांनी मुक्काम केला.आंदोलनाची वेळ झाली. बरोबर ११ वाजता राणी चेन्नमा चौकात लोक जमू लागले. अचानकपणे हजारो लोक जमल्याने पोलिस गोंधळले. संतप्त पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. साहेब, बाबासाहेब कुपेकर, आदींना पोलिसांनी बेदम मारहाण केली.

साहेबांना हिडकल डॅमच्या परिसरातील विश्रामगृहावर आणण्यात आलं. तेथेही लोक जमा झाले. वयस्कर एस एम जोशी साहेबांना भेटायला गेले. त्यांनी त्यावेळी साहेबांच्या पाठीवरील पोलिसांनी मारहाण केलेले वळ पाहिले. ते पाहून एसएम हळहळले होते. हा भारावलेला काळ कुठे आणि आजचा काळ कुठे? सारंच ३६० अंशात बदललंय.

महत्वाच्या बातम्या :

Supriya Sule | मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून सध्या राज्यातील राजकारण तापलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. या …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now