fbpx

पुरंदरमधील विमानतळ विरोधी गावांचा सुप्रिया सुळेंना पाठींबा

टीम महाराष्ट्र देशा : निवडणुकींचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आल्या असून मतदानाच्या तारखा आत जवळ येऊ लागल्या आहेत. त्यामुळे उमेदवारांनी प्रचाराचा चांगलाच धडाका लावला आहे. बारामती लोकसभा मतदार संघात देखील युती आणि आघाडीच्या दोन्ही उमेदवारांनी गाव निहाय प्रचाराला सुरवात केली आहे. शुक्रवारी आघाडीच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी पुरंदरमधील विमानतळ विरोधी गावांना भेट दिली.

यावेळी सुप्रिया सुळे यांनी विमानतळ विरोधी गावांना विमानतळामुळे तुमची गावे उद्ध्वस्त होणार नाहीत असा शब्द दिला. तर तुमचा विमानतळाला नव्हे तर विमानतळाच्या जागेला विरोध आहे. त्यामुळे आपण त्या जागेत बदल करू असे आश्वासन देखील त्यांनी दिले.

प्रस्तावित विमानतळ विरोधी गावांतील शेतकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. मात्र सुप्रिया सुळे यांनी दिलेल्या आश्वासनांमुळे शेतकऱ्यांनी आता मतदानावरचा बहिष्कार मागे घेतला आहे. तर यावेळी शेतकऱ्यांनी भाजपला मतदार करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. संविधानाचा अपमान करणाऱ्यांना मतदान करणार नसल्याचा निर्धार यावेळी गावकऱ्यांनी केला आहे. तर आपले हात उंचावून सुप्रिया सुळे यांना गावकऱ्यांनी पाठींबा दिला आहे.

दरम्यान बारामती मतदार संघात रंगतदार लढत होणार असून युती आणि आघाडीचे दोन्ही उमेदवार एकमेकांना तोडीस तोड आहेत. सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध युतीकडून भाजपच्या कांचन कुल उतरल्या आहेत. कांचन कुल यांनी देखील प्रचाराचा चांगलाच जोर पकडला आहे. तर यावेळी पवारांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा फडकवणारचं असा निर्धार त्यांनी केला आहे.