सरकारला प्रचाराला हेलिकॉप्टरने फिरायला वेळ आहे, पण दुष्काळात होरपळणाऱ्या लोकांना भेटायला वेळ नाही – सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे, मुख्यमंत्री

टीम महाराष्ट्र देशा : दौंड तालुक्याच्या दुष्काळी दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवरून जोरदार टीका केली आहे. सरकारला निवडणूक काळात हेलिकॉप्टरने फिरायला वेळ आहे. परंतु दुष्काळात होरपळणाऱ्या लोकांना भेटायला वेळ नाही असा घणाघात देखील यावेळी सुळेंनी सरकारवर केला

तसेच राज्यात यावर्षी मोठा दुष्काळ पडला आहे. जनता पाण्यासाठी वणवण फिरत आहे. मुख्यमंत्री वातानुकुल खोलीत बसून केवळ फोनवरून दुष्काळाची माहिती घेत असल्याची टीका यावेळी सुळेंनी केली. आम्ही सत्तेत असतानाही दुष्काळाबाबत संवेदनशील होतो आणि आता विरोधी पक्षात असताना सुद्धा असे सांगत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आज सुद्धा लोकांच्यामध्ये जाऊन समस्या जाणून घेत असल्याच स्पष्टीकरन सुळेंनी यावेळी दिले.