fbpx

विनोद तावडे शिक्षणात इतकं राजकारण आणू नका – सुप्रिया सुळे

supriya sule and vinod tavde

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात 24 राज्यातील विद्यार्थ्यांशी परीक्षा विषयावर संवाद साधला. मोदींच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने आदेश काढला होता, त्यामुळे हा कार्यक्रम आता वादात सापडला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावरून राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना लक्ष करत जोरदार टीका केली आहे.

मराठी शाळा बंद पडत आहेत. शिक्षकांची भरती होत नाही. असलेल्या शिक्षकांच्या मागण्या पुरवता येत नाहीत पण सरकारचं लक्ष मात्र शाळेतल्या मुलांनाही आपल्या प्रचाराच्या जाळ्यात ओढण्याचं आहे. विनोद तावडे शिक्षणात इतकं राजकारण आणू नका. अस सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

दरम्यान, ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने आदेश काढला होता. यातील सूचना वाचल्यावर धक्का बसतो. सहावीच्या इयत्तेपुढील सर्व विद्यार्थ्यांना हा कार्यक्रम दाखवण्यासाठी आवश्यक सुविधा शाळांमध्ये उपलब्ध करुन देण्यात याव्यात. कार्यक्रमाच्या दिवशी लाईट जाण्याची शक्यता असल्यास जनरेटरची सुविधा उपलब्ध करुन घ्यावी, असे आदेश देण्यात आले होते. एवढेच नव्हे, तर ज्या दुर्गम ठिकाणी टीव्ही सिग्नल नाही, अशा ठिकाणी रेडिओ किंवा एफएमवरुन कार्यक्रम ऐकवावा, असे आदेशदेण्यात आले होते.

कार्यक्रम विद्यार्थ्यांना ऐकवला, म्हणजे सर्व संपले असेही नाही. शिक्षण मंत्रालयाने पुढेही आदेश दिले होते की कार्यक्रम दुपारी एक वाजता संपल्यानंतर 2 वाजता कार्यक्रमाचा अहवाल सादर करावा. तो अहवाल 3 वाजेपर्यंत पंतप्रधान कार्यालयाला देण्यात येणार आहे. अहवालात कार्यक्रम बघतानाचे मुलांचे 5 फोटो आणि 3 मिनिटांचा व्हिडीओ असायलाचं हवा, असे तुघलकी फर्मान सुद्धा या आदेशात होते.