‘मेक इन’ नव्हे हा तर ‘ब्रेक इन इंडिया’ -सुप्रिया सुळे

Narendra-modi-vs supriya-sule-

टीम महाराष्ट्र देशा- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या पहिल्या ब्लॉग मधून मोदी सरकारचा चांगलाच समाचार घेतला आहे. कोरेगाव भीमा येथे झालेला हिंसाचार,शेतकऱ्यांचे प्रश्न,फसलेल्या योजना आदी मुद्द्यांवरून सरकारला चांगलच धारेवर धरलं. मेक इन इंडिया या सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेवर सडकून टीका करताना सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे उद्योग धंद अडचणीत आले असल्याच मत त्यांनी व्यक्त केलं आहे .मेक इन इंडिया योजनेमुळे भारताच्या विकासाला ब्रेक लागल्याची टीका सुळे यांनी केली आहे.

सुप्रिया सुळे यांचा ब्लॉग

स्थित्यंतराच्या दिशेने…

नमस्कार, तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ! संक्रांत म्हणजे स्थित्यंतर ! सूर्याचे उत्तरायण आजपासून सुरू होते ! आपल्या आकाशगंगेच्या महत्त्वाच्या बदलातील एक क्षण म्हणजे ही संक्रांत !!

आज देशातही असंच स्थित्यंतर सुरू आहे. सुप्रीम कोर्टाच्या जजेसनी अभूतपूर्व अशी पत्रकार परिषद घेऊन या देशातली लोकशाही वाचवायची साद लोकांना घातलीय. ज्यांच्याकडे न्यायाची अपेक्षा घेऊन सामान्य माणूस जातो त्यांनीच न्याय मिळावा म्हणून लोकशाहितल्या सर्वशक्तिमान न्यायालयाला, म्हणजे जनतेला आवाहन केलेय. जगभरात या घटनेला भारतीय लोकशाहीचा आक्रोश म्हणून पाहिलं जातंय. अश्या काळात, इथल्या मनूवादी हुकूमशाही प्रवृत्तीच्या विरोधात निर्णायक लढाई लढण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर येऊन पडते. आजपासून सुरू होणारा हा माझा ब्लॉग त्याच लढाईचा माझ्यापरीने छोटासा पण निर्धारपूर्वक सुरू झालेला भाग आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्रात सरकार येऊन आता पावणेचार वर्ष झाली. पुढच्या वर्षी या दिवशी निवडणुकांचे नगारे जोराने वाजू लागलेले असतील. पण, एक नागरिक म्हणून आपणच हा प्रश्न विचारला पाहिजे की ह्या पावणेचार वर्षांत नेमकं काय झालं ? ज्या आशेने मोदींच्या ‘अच्छे दिन’च्या आवाहनाला देशाने एकमुखी प्रतिसाद दिला होता त्याचा सन्मान ठेवला गेला का ?

मी मागच्याच आठवड्यात माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि वरिष्ठ भाजपा नेते यशवंत सिन्हा यांची एक मुलाखत बघत होते. जे मागच्या सहा महिन्यांपासून केवळ माझ्या आणि राष्ट्रवादी पक्षाच्या सगळ्या सहका-यांच्याच नव्हे तर लाखो लोकांच्या मनात आहे ते सिन्हा साहेबांनी नेमक्या शब्दांत मांडलंय. ते म्हणाले,  “Mandate of 2014 has been wasted completely.”म्हणजे 2014 च्या जनाधाराला या सरकारने पूर्णतः फुकट घालवले आहे.

खरंतर, 2014 ला देशात आलेले सरकार हे त्याआधीच्या 30 वर्षांतले पहिले पूर्ण बहुमताने आलेले सरकार होते. राजीवजी गांधी यांना इंदिराजींच्या हत्येनंतर प्रचंड बहुमत मिळालं होतं. आणि ह्याच बहुमताच्या विश्वासावर राजीवजींनी 21 व्या शतकाकडे जाणाऱ्या आधुनिक, बलशाली भारताचं स्वप्न पाहिलं होतं. याच स्वप्नाचा एक भाग म्हणून त्यांनी ह्या देशात संगणक क्रांतीचा पाया घातला. पुढच्या अवघ्या 15 वर्षांत मुळातच मेहनती आणि जिद्दी असणाऱ्या भारतीय तरुणांनी जगासमोर हा देश आयटी सुपरपॉवर म्हणून उभा केला. याला म्हणतात व्हिजन आणि त्या व्हिजनच्या दिशेने केलेली अंमलबजावणी !

आज आपणाला काय दिसतं ? 2014 च्या जनाधाराच्या जोरावर मोदींनी भारताला कसलं व्हिजन दाखवलं ? अश्या कुठल्या योजना आणल्या ज्यांच्यामुळे भारताच्या विकासाला हातभार लागला ?

एक योजना उदाहरण म्हणून बघूया. या सरकारने ‘मेक इन इंडिया’ आणली. म्हणजे फक्त घोषणा केली. मी चाकणच्या परिसरात अधूनमधून जात असते. एकेकाळी ऑटोमोबाईल उद्योगासाठी लागणा-या सुट्या पार्ट्सच्या निर्मितीसाठी हा भाग ओळखला जाई. आज इथे जीवघेणा सन्नाटा आहे. शेकडोंच्या नोक-या इथे गेल्या. डबल शिफ्टमध्ये चालणारे मध्यम दर्जाचे उद्योग बंद पडले. हे यांच्या ‘मेक इन इंडिया’चं खरं चित्र आहे. हे ‘मेक इन’ नाही, ‘ब्रेक इन इंडिया’ आहे. भारताच्या विकासाला लागलेला हा ब्रेक आहे.

जी स्थिती उद्योगांची आहे त्याहून भयानक स्थिती ही शेतीक्षेत्राची आहे. नुकतेच आमच्या पक्षाचे हल्लाबोल आंदोलन पार पडले. यवतमाळ ते नागपूर हे 150 किलोमीटरचे अंतर आम्ही सर्व सहकारी चालत होतो. राज्यात मागच्या 3 वर्षात जवळपास 10 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात. सगळ्यात जास्त आत्महत्या ह्या यवतमाळ जिल्ह्यात झाल्यात. आम्ही जेव्हा या यात्रेत चालत होतो तेव्हा ठिकठिकाणी शेकडोंच्या संख्येने लोक सहभागी होत होते. कापसाला लागलेली बोन्ड अळी आणि राज्य सरकारचं त्याकडे झालेलं पूर्ण दुर्लक्ष आम्ही पाहिलं. पिकांवर फवारायच्या औषधाने 37 लोक गेले. हे भयंकर आहे. आणि अजूनही याला जबाबदार असणाऱ्या अधिका-यांवर काहीही ठोस कारवाई झालेली नाही. अस्मानीपेक्षा सुलतानी संकट आपल्यावर येऊ नये म्हणून प्रार्थना करणारा मराठवाडा आणि विदर्भातला कास्तकार आम्ही बघतोय. ह्या सरकारला खरंतर एकही क्षण सत्तेवर रहायचा अधिकार उरला नाहीये ही त्या कास्तकारांचीच भावना आहे.

अश्या या अनागोंदीनंतर देशाचा विकासदर घसरेल नाहीतर काय ? यावर्षीचा भारताचा विकासदर हा 6.5 टक्के असेल असा अंदाज आहे. 3 वर्षात ही जवळपास 2 टक्क्यांची घसरण आहे. एकीकडे जगभरात पुन्हा एकदा देशोदेशीच्या अर्थव्यवस्था मजबूत होऊ लागलेल्या असताना भारतात मात्र उलटी स्थिती आहे. मंदी आहे ! आणि त्याला केंद्र आणि राज्य सरकारांची धोरणं जबाबदार आहेत.

आज देशात कुठलाही मोठा उद्योजक गुंतवणूक करायलाच तयार नाही. तुम्ही बघा, महाराष्ट्रात मागच्या 3 वर्षात एकही मोठा उद्योग आला नाही. भरघोस अशी गुंतवणूक झालेली नाही. उलट लोकांना आयटी असो, बँकिंग असो किंवा अगदी पॉवर सेक्टर असो, या सगळीकडे नोक-या गमवाव्या लागल्या. आपण हाही विचार केला पाहिजे की असं का होतंय ?

याला दोन महत्वाची कारणं आहेत असं मला वाटतं. एक म्हणजे सरकारची फसलेली धोरणं. आपण मेक इन इंडियाबद्दल बघितलं. नोटबंदीचा निर्णय आणि जीएसटीची चुकीची अंमलबजावणी यांनी भारतीय बाजारपेठेला अभूतपूर्व धक्का बसलाय. इथल्या उद्योगांचे कंबरडे मोडलेय. याबद्दल निव्वळ भारतातच नव्हे तर जगभरातच प्रचंड प्रमाणावर टीका झालीय. तुम्ही ती वाचलेली असेलच. दुसरं कारण या परिस्थितीसाठी आहे ते म्हणजे समाजातली अस्वस्थता. ज्या गावात शांतता नसते त्या गावात कोणी दुकान टाकत नाही हा आपला गावाकडचा अनुभव आहे. मोठ्या उद्योगांच्या बाबतीत हेच कमी अधिक फरकाने असतं. ते तुम्हाला गुंतवणूक करतो असं सांगणारे, आश्वासन देणारे सामंजस्य करार करतात. पण प्रत्यक्षात मात्र जमिनीवर पैसे गुंतवत नाहीत.

काय दिसते समाजाच्या शांतीच्या पातळीवर आज देशातली परिस्थिती ? या सरकारच्या जवळच्या मनुवादी सहका-यांनी देशभर अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. गोरक्षा असो किंवा लव्ह जिहाद, घरवापसी असो किंवा लोकांच्या खाण्यावर, कपड्यांवर बंधनं आणायची बाब, सगळीकडे आज ह्या लोकांची दहशत आहे. समाजातील सर्व घटकांना भीतीच्या वातावरणात ठेवणे आणि आपला अजेंडा रेटणे हा संघ परिवाराचा डाव देशाच्या विकासाला अडथळा ठरतोय. आणि सत्तेत असलेल्या लोकांनी आपल्या खुर्चीसाठी ह्या हिंसाचाराला रोखलं नाहीये.

हे सगळे हिंसात्मक प्रकार केंद्रात मोदी सरकार आल्यापासून लगेचच सुरू झाले होते. सुरुवातीला मोदी हे रोखतील असं वाटत होतं. पण, उत्तर प्रदेश आणि विशेषतः गुजरात निवडणुकीच्या त्यांच्या प्रचारानंतर मोदींच्या भूमिकेवरच प्रश्न उभे राहिलेत. स्मशान आणि कब्रस्तान असा भेद करणारे त्यांचे भाषण समाजात हिंदू मुस्लिम तेढ वाढावी याच हेतूचे होते हे काही लपून राहिलेले नाही. गुजरातच्या निवडणुकीत तर मोदींनी आपल्याच 2014 च्या प्रचारातल्या ‘गुजरात मॉडेल’ला पोरकं करून टाकलं ! एकही अक्षर ते विकासाबद्दल बोलले नाहीत !! उलट धर्म आणि जातींमध्ये वाद लावून आपली सत्ता कशीबशी टिकवण्यात त्यांनी यश मिळवलं.

खरंतर, हेच गुजरात मॉडेल आहे !! समाजात वाद व्हावेत, शांतता भंग व्हावी, आपल्या हाताशी असणाऱ्या गुंडांच्या जीवावर धर्म आणि जातीवरून भांडणं लावावीत आणि आपली सत्ता टिकवावी हेच खरे गुजरात मॉडेल आहे !! आपल्या भीमा कोरेगांवच्या वादाच्या निमित्ताने इथल्या बहुजन समाजात, शाहू फुले, आंबेडकरांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवरायप्रेमी मराठी समाजात विष कालवायचे पाप हीच सत्तांध, जातीयवादी विचारधारा करतेय हे आता महाराष्ट्राच्याही लक्षात आलेय !!!

याला सगळ्या पातळ्यांवर विरोध करायची जबाबदारी आपली आहे. महाराष्ट्राने देशाला वेळोवेळी दिशा दिलीय. ह्या देशातले तमाम धर्म, जाती, उपजाती, समाज आणि पंथ एकीने रहावेत, गुण्या गोविंदाने नांदावेत ह्यासाठी महाराष्ट्रानेच आपल्या प्राणांची बाजी लावलीय ! आज पुन्हा एकदा हा लढा उभा करण्याची वेळ आलीय.

ह्या प्राचीन, सुसंस्कृत देशाला संविधानाच्या प्रेरणेने वाटचाल ठेवायची आहे. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन इथल्या तमाम जातीयवादी शक्तींना उखडून टाकायचा लढा लढायचा आहे. स्थित्यंतराची, परिवर्तनाची ही लढाई आई जिजाऊंच्या आशीर्वादाने आपण सगळ्यांनी लढायला सुरुवात करूयात ! यश आपलंच आहे !! कारण, तुमचं माझं नातं काय ?

जय शिवराय ….जय भीमराय !!!

सुप्रिया सुळेLoading…
Loading...