सुप्रिया सुळेंसोबत दादर रेल्वे स्थानकावर गैरवर्तन, रेल्वे पोलिसांची धडक कारवाई

टीम महाराष्ट्र देशा : समान्य महिलांना रोजचा सहन करावा लागणारा त्रास आज चक्क एका लोकप्रतिनिधीला सहन करावा लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंसोबत आज दादर रेल्वे स्थानकावर गैरवर्तन केल्याची घटना घडली आहे. एका टॅक्सी एजंटने सुप्रिया सुळे यांचा रस्ता अडवल्याची घटना घडली आहे. तर याबाबत खुद्द सुप्रिया सुळे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे.

टॅक्सी एजंट कुलजितसिंग मल्होत्रा नावाच्या इसमाने माझा रस्ता अडवल्याचे सुप्रिया सुळेंनी सांगितले. याप्रकरणी त्यांनी ट्वीटद्वारे रेल्वे पोलिसांकडे तक्रार करून संबंधित व्यक्तीवर कारवाईची मागणी केली आहे. दादर स्टेशनवर कुलजितसिंग मल्होत्रा नावाच्या व्यक्तीने ट्रेनमध्ये प्रवेश केला आणि सुप्रियांकडे टॅक्सीसाठी विचारणा केली. सुप्रियांनी त्याला दोन वेळा नकार देऊनही त्याने त्यांचा मार्ग अडवला आणि निर्लज्जपणे त्यांच्यासोबत फोटोसाठी विचारणा केली असल्याचे सुप्रिया सुळेंनी ट्वीट करत सांगितले.

यानंतर सुप्रियांनी आणखी एक ट्विट करत प्रवाशांना पुन्हा अशा घटनांचा सामना करावा लागू नये यासाठी या प्रकरणात लक्ष द्या असे रेल्वे प्रशासनाला सांगितले. कायद्यानुसार टॅक्सीची विचारणा करण्याची परवानगी असल्यास ती रेल्वे स्थानक किंवा विमानतळांवरील केवळ ठरवलेल्या टॅक्सी स्टँडवर असते.दरम्यान सुप्रिया सुळेंनी केलेल्या तक्रारीवरून रेल्वे प्रशासनाने त्वरीत पाऊले उचलत मल्होत्रावर कारवाई केली. या कारवाईनंतर सुप्रिया सुळेंनी ट्वीट करून रेल्वे पोलिस प्रशासनाचे आभार मानले.