पुरोगामी विचाराच्या भारतात महिलांवरील बलात्कार वाढले – सुप्रिया सुळे

हरियाणातील सामुहिक बलात्काराच्या घटनेचा जाहीर निषेध...

मुंबई  – पुरोगामी विचाराच्या भारतात महिलांवर होणारे बलात्कार वाढतच चालले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने मुलींच्या शिक्षणाबाबत, सुरक्षिततेबाबत बोलत असतात मग त्यांच्याच सरकारमध्ये अशा घटना का घडत आहेत. त्याबाबत मोदी मौन बाळगून का आहेत असा सवाल करतानाच आज हरियाणामध्ये मुलीवर झालेल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेचा जाहीर निषेध खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

हरियाणातील सुशिक्षित घरातील मुलगी शिक्षणासाठी आली होती. तिच्यावर आज सामुहिक बलात्कार होतो त्याचा आपण सगळयांनी जाहीर निषेध केला पाहिजे असेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

महाराष्ट्रामध्येही सातत्याने मुलींची होणारी छेडछाड,बलात्कारअशा गोष्टी घडत आहेत. मुंबईमध्ये अपहरण होवून बेपत्ता होणाऱ्या मुलींची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे.सरकारच्या क्राईम रिपोर्टमध्ये अडीच ते तीन हजार मुली बेपत्ता असल्याची आकडेवारी देण्यात आलेली आहे. याचं उत्तर कोण देणार असा संतप्त सवालही खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहमंत्रीपद आहे. त्यांचा एक आमदार मुलींचे अपहरण करुन उचलून नेण्याची भाषा करतात त्यावेळी महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी एक शब्दही काढला नाही. हे या सरकारचं अपयश आहे असा आरोप करतानाच त्या घटनेचाही जाहीर निषेध खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.