गोरखपूर दुर्घटनाप्रकरणी सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने गोरखपूर दुर्घटना प्रकरणी सुनावणी करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला अलाहाबाद उच्च न्यायालयात आपली याचिका दाखल करण्यास सांगितले. सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने हे आदेश दिले. गोरखपूर दुर्घटनेची चौकशी विशेष तपास पथकाद्वारे करण्यात यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. मात्र, ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. हे प्रकरण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हाताळत आहेत. काही त्रुटी राहिल्यास त्या उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाद्वारे चौकशी करण्यात यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी केली आहे.