‘इतके वर्षे पोलिसांत होता, तरी त्यांच्यावर विश्वास नाही?’, परमबीर सिंह यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले

नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी त्यांच्या विरोधातील सर्व चौकशा महाराष्ट्राबाहेरील स्वतंत्र संस्थेकडे सोपवाव्यात, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. त्यावर आज शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. ‘इतके वर्ष महाराष्ट्र पोलिसांत होता तरी त्यांच्यावर तुम्हाला विश्वास नाही का? असा प्रश्न करत परमबीर सिंह यांना फटकारले आहे. सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे.

माजी पोलीस आयुक्त असलेल्या परमबीर सिंह यांनी आपल्याविरोधात करण्यात येणारी चौकशी हा सुडाचा भाग असल्याचे म्हणत यासाठी महाराष्ट्राबाहेरील स्वतंत्र संस्थेकडे सोपवाव्यात, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे चौकशीदरम्यान उल्लंघन झाले आहे असे याचिकेत म्हटले होते.

सर्वोच्च न्यायालय काय म्हणाले?
तुम्ही महाराष्ट्र केडरचा भाग आहात. तुम्ही तब्बल 30 वर्षे महाराष्ट्राची सेवा केली. मात्र आता तुम्हाला तुमच्या स्वतःच्या राज्याच्या कारभारावर विश्वास नाही? हा धक्कादायक आरोप आहे!. तुम्हाला फौजदारी कायद्याचे ज्ञान आहे. तुमच्या विरोधात दाखल झालेल्या एफआयआरवर आम्ही स्थगिती द्यावी का? आम्ही सर्व एफआयआरबद्दल बोलत नाही. एफआयरासाठी न्यायदंडाधिकारी आहेत त्यांच्याकडे जावा, असं कोर्टानं सांगितलं. न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांनी जे काचेच्या घरात राहतात त्यांनी दगडं मारु नयेत, असं म्हटलं.

परमबीर सिंह हे १९८८ च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी असून मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून त्यांना १७ मार्च रोजी काढून टाकण्यात आले होते. नंतर त्यांना महाराष्ट्र राज्य गृहरक्षक दलाचे जनरल कमांडर पद देण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचार व गैरवर्तनाचा आरोप केला होता. मुंबई उच्च न्यायालयाने नंतर सिंह यांनी देशमुख यांच्या विरोधात केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. यामुळे देशमुख यांनी मंत्रिपदाचा राजीनामाही दिला होता.

महत्वाच्या बातम्या 

IMP