मराठा आरक्षणाच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात निकाल

मराठा

नवी दिल्ली- मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या मराठा आरक्षणाच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्ट निर्णय देणार आहे. सकाळी 10.30 च्या सुमारास मराठा आरक्षण प्रकरणी राखीव असलेला निकाल सुनावणार आहे. सुप्रीम कोर्टाने 26 मार्चला निकाल राखून ठेवला होता.

अॅड. जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यानंतर खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याबाबत सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.

महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला 12 ते 13 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर मुंबई उच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले होते. पण अॅड. जयश्री पाटील यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.दरम्यान, मराठा आरक्षणाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देऊन सर्वोच्च न्यायालयात असंख्य याचिका दाखल झाल्या होत्या. त्यानंतर न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली होती.

राज्य सरकारसह मराठा आरक्षणासाठी लढा देत असलेल्या संस्था, संघटनांनी केलेल्या प्रयत्नांनंतर न्यायालयाने हा खटला पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सुपूर्द केला होता. त्यानुसार न्या. अशोक भूषण, एल. नागेश्वर राव, एस. अब्दुल नजीर, हेमंत गुप्ता तसेच हेमंत भट या न्यायमूर्तींसमोर सुनावणी झाली होती.

आरक्षणाला 50 टक्क्यांची मर्यादा असावी, असा आदेश 1992 मध्ये (इंदिरा सहानी प्रकरण) सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्या आदेशाची पुनर्पडताळणी करायची की नाही, याबाबत घटनापीठ कोणता निर्णय देते, ते अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मराठा आरक्षण खटल्याची सुनावणी करताना घटनापीठाने 50 टक्के आरक्षण मर्यादेबाबत सर्व राज्यांची मते मागविली होती. मराठा आरक्षण खटल्याची 15 मार्चला सुरू झालेली सुनावणी 26 मार्चला संपली होती.

महत्त्वाच्या बातम्या