fbpx

लालूंना दणका, निवडणुकीत प्रचार करता येणार नाही,न्यायालयाने जामीन नाकारला

LaluYadav

टीम महाराष्ट्र देशा- राजदचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. कोट्यवधींच्या चारा घोटाळ्याप्रकरणी लालूप्रसाद यांना शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मात्र, निवडणूक प्रचारासाठी जामीन मिळावा अशी याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यांची याचिका फेटाळून लावत सर्वोच्च न्यायलयाने त्यांना जामीन नाकारला आहे.

यादव यांना जमीन देण्यास सीबीआय ने कडाडून विरोध केला होता. चारा घोटाळ्यातील विविध प्रकरणांमध्ये तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मात्र ते तुरुंगात कमी आणि रुग्णालयात जास्त असल्याचं वारंवार समोर येते. मग शिक्षा भोगत असलेले लालूप्रसाद यादव आत्तापर्यंत रुग्णालयात भर्ती होते , मग निवडणुकीच्या प्रचारासाठी ते ठणठणीत कसे झाले असा रोकठोक सवाल सीबीआयच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये उपस्थित केला.

लालूप्रसाद यादव यांनी फक्त 6 महिने तुरुंगात घालवले असून उरलेले 8 महिने त्यांनी तब्येत बरी नसल्याचे कारण पुढे करत रुग्णालयात घालवले आहेत.सीबीआयने मार्च 2018 ते मार्च 2019 या काळामध्ये लालू यांना भेटायला आलेल्या 80 राजकारण्यांच्या नावाची यादीही न्यायालयाला सादर केली आहे. लालू यांना अत्याधुनिक सुविधा असलेल्या विशेष वॉर्डात ठेवलं असून तिथून ते राजकीय काम देखील करत होते असं सीबीआयने न्यायालयाला सांगितलं आहे.