रामजन्मभूमी आणि बाबरी मस्जिद भूमी वादाबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

RamMandir

टीम महाराष्ट्र देशा : देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मस्जिद भूमी वादाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. याप्रकरणात अलाहाबाद हायकोर्टाच्या 2010 मधील निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात 14 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. याशिवाय या खटल्यात दिरंगाई होत असल्याबाबत दाखल याचिकेवरही आजच सुनावणी होणार आहे. मागील सुनावणीत सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी याप्रकरणाच्या सुनावणीची तारीख आणि खंडपीठाच्या निर्णयाबाबत सांगितलं होतं. त्याचवेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याप्रकरणाची सुनावणी दररोज फास्टट्रॅक व्हावी असं म्हटलं होतं.

दरम्यान, अलाहाबाद हायकोर्टाने आपल्या निर्णयात अयोध्येतील 2.77 एकर जमीन सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि राम लल्ला यांना समान वाटण्याचा निर्णय दिला होता.

सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची मागील सुनावणी 29 ऑक्टोबर रोजी झाली होती. त्यावेळी कोर्टाने याप्रकरणाची सुनावणी खंडपीठासमोर होईल आणि तेच खंडपीठ सुनावणीची रुपरेषा ठरवेल, असं म्हटलं होतं. अखिल भारतीय हिंदू महासभेने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करुन, याप्रकरणाची सुनावणी तातडीने करण्याची मागणी केली होती. मात्र कोर्टाने ती मागणी फेटाळली होती.