सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली कोपर्डी प्रकरणातील आरोपींची याचिका

अहमदनगर : संपूर्ण राज्यभर खळबळ उडवून देणा-या कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा अतिशय निर्घृण पध्दतीने खून केल्याच्या प्रकरणातील आरोपी संतोष भवाळ याच्या वतीने या प्रकरणातील सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्यासहीत एकूण ६ जणांना बचाव पक्षाच्या वतीने साक्षीसाठी बोलावण्यासाठी सादर केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली. अहमदनगरच्या जिल्हा न्यायालयात गेल्या काही दिवसांपासून कोपर्डी प्रकरणाची नियमित सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात सरकारच्या वतीने साक्षीदार तपासण्याचे काम पूर्ण झाले. त्यानंतर आरोपी संतोष भवाळ याच्यावतीने जिल्हा न्यायालयात सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम, जिल्हाधिकारी अभय महाजन, मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची सीडी तयार करणारे रविंद्र चव्हाण, राज्याचे हेल्थ इंटेलिजन्सचे संचालक डॉ. राजेंद्र थोरात, वृत्तवाहिनीचे संपादक डॉ. उदय निरगुडकर, नाशिक येथील न्यायवैद्यक प्रयोगाशाळेचे संचालक यांना बचाव पक्षाचे साक्षीदार म्हणून तपासण्याची मागणी करणारा अर्ज सादर करण्यात आला होता. मात्र जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी आरोपी भवाळचा हा अर्ज फेटाळून लावला होता. त्यावर आरोपीच्या वतीने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची सीडी तयार करणारे रविंद्र चव्हाण या केवळ एकाची साक्ष घेण्यास परवानगी देऊन अन्य सहा जणांना साक्षीसाठी बोलावण्याची मागणी करणारा आरोपीचा अर्ज फेटाळून लावला होता. दरम्यान आरोपीच्या वतीने या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने देखील गुरूवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी आरोपी संतोष भवाळ याच्यावतीने दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळून लावली आहे. कोपर्डी प्रकरणाची सुनावणी आता अंतिम टप्प्यात असून उच्च न्यायालयाने परवानगी दिलेल्या एका साक्षीदाराची तपासणी व उलट तपासणी झाल्यानंतर दोन्ही बाजूच्या वकिलांचे युक्तीवाद होणार आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात आरोपींच्या याचिकेवर काय निर्णय घेतला जाईल, याची मोठी उत्सुकता जिल्ह्यात होती.