अहमदनगर: काल पुण्यामध्ये भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा दौरा होता. या दौऱ्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून स्मृती इराणी यांचा विरोध करण्यात आला. स्मृती इराणी यांच्या भाषणावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला. यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी आमने सामने आले. या आंदोलनात भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यावर हात उचलल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या पाश्वर्भूमीवरून आता राष्ट्रवादीचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
रोहित पवार यांनी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीवरून राज्य पातळीवरील भाजप नेत्यांवर निशाणा धरला आहे. चंद्रकांत दादा पाटील आणि देवेंद्र फडणवीस साहेब आपण मोठे नेते आहात. किमान आपण तरी आपल्या कार्यकर्त्यांना समज द्याल आणि आवराल अशी अपेक्षा होती. पण आपणच अशा प्रवृत्तीला पाठबळ देण्याचा प्रयत्न करत असाल तर हे दुर्दैवी आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला कधीही न शोभणारं आहे, असे रोहित पवार म्हणाले. भाजपने राजकारणाचा स्तर आधीच घालवला आहे, आता किमान महाराष्ट्राची संस्कृती तरी घालवू नये आणि या मारहाण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी, अशी मागणीही रोहित पवार यांनी केली आहे.
तसेच “गॅस सिलिंडर ३५० रुपयांना मिळत असताना एकेकाळी रस्त्यावर उतरून महागाईविरोधात आंदोलन करणाऱ्या स्मृती ताईंच्या स्मृती जागृत करण्यासाठी निवेदन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना भाजपच्या पुरुष कार्यकर्त्यांकडून झालेली मारहाण अत्यंत निंदनीय आहे”, असेही रोहित पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –