नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा करा अन्यथा कारवाई : ऊर्जामंत्री

टीम महाराष्ट्र देशा- वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी आवश्यक देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यात यावे व एखाद्या परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार आढळून आल्यास त्याची जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला दिले.

प्रकाशभवन येथे महावितरण व महापारेषणच्या पुणे जिल्ह्यातील कामांचा ऊर्जामंत्री ना. श्री. बावनकुळे यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी सर्वाधिक वीजपुरवठा खंडित होत असलेल्या परिसरांची व विभागांची नावे जाणून घेतली. नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा देण्यासाठी वीजयंत्रणेवर बारीक लक्ष ठेवावे व खंडित होण्याचे नेमक्या कारणांवर कायमस्वरुपी उपाययोजना करावी. वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडल्यास त्याचा कालावधी कमीतकमी राहील याचेही प्रयत्न करण्याची सूचना यावेळी  बावनकुळे यांनी दिली.

दरम्यान पुणे जिल्ह्यातील महापारेषणच्या विविध उपकेंद्राची सुरु असलेली कामे जलदगतीने पूर्ण करण्यासाठी संबंधीत कंत्राटदारांविरुद्ध कठोर भूमिका घ्यावी. प्रसंगी त्यांना काळ्या यादीत समाविष्ट करून नव्या कंत्राटदारांना कामे देण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी महावितरणचे मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार, श्री. सुनील पावडे, श्री. अनिल भोसले, महापारेषणचे मुख्य अभियंता श्री. रोहीदास मस्के तसेच अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

बावनकुळे यांनी विष प्यायल्यानंतर त्यांच्यावर उपचार करायचे की नाही हे आम्ही ठरवू- राजू शेट्टी

पुणे जिल्ह्यातील वाडीपाडे झाले ‘प्रकाशमान’