‘सुपर स्पेशालिटी’तीन महिने लांबणीवर

'Super Specialty' for three months to defer

आौरंगाबाद : घाटी रुग्णालयात केंद्र आणि राज्य सरकारच्या साहाय्याने उभारण्यात येणा-या २५३ खाटांच्या स्वतंत्र सुपर स्पेशालिटी विभागाच्या इमारतीचे कामकाज डिसेंबर २०१७ अखेरीस पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु काम पूर्ण होण्यास आणखी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
सुपर स्पेशालिटी विभागाच्या इमारतीची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी पाच मजली इमारतीच्या प्रत्येक मजल्यावरील कामाचा आढावा घेत काही सूचनाही केल्या. प्लास्टर, टाईल्स यांसह अन्य कामे शिल्लक असून ती पूर्ण होण्यास तीन महिन्यांचा कालावधी लागेल, असे डॉ. येळीकर यांनी सांगितले. या विभागासाठी घाटी प्रशासनाने १४१४ पदांचा प्रस्ताव तयार करून दिला होता. यामध्ये वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने ११२७ पदांना मान्यता दिली आहे. यातील ४०७ पदांना पहिल्या टप्प्यात मान्यता मिळाली आहे, असेही त्यांनी सांगितले. इमारतीच्या पाहणीप्रसंगी डॉ. अनंत बीडकर, डॉ. वर्षा रोटे, डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांच्यासह बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
विभागात हृदयरोग, मेंदूविकार, मूत्रपिंड विकार यांसह विविध सुपर स्पेशालिटीचे सर्व उपचार उपलब्ध केले जाणार आहेत. विभागाच्या इमारतीचे काम पूर्ण होताच विभाग रुग्णसेवेत दाखल होणे आवश्यक आहे; परंतु येथील पदभरतीअभावी इमारत पूर्ण झाल्यानंतरही रुग्णसेवेची प्रतिक्षा करावी लागण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.