सुप्रिया सुळे यांचा संवाद दौरा आजपासून सुरु

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्ष चांगलेच सक्रीय झालेले आहेत. याच पार्श्वभूमीवर नेते आणि कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. अशातच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या संवाद दौरा काढणार आहेत.

या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या सहा जिल्ह्यात जाणार आहेत. या दौऱ्यात त्या राज्यातील पूर परिस्थिती, दुष्काळ, बेरोजगारी, महिला सुरक्षा, ढिसाळ कारभार याचा आढावा घेणार आहेत. संवाद दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या अहमदनगर, सोलापूर, जळगाव, नाशिक, ठाणे, नागपूर, नवी मुंबई या जिल्ह्यात सुप्रिया सुळे संवाद दौरा करणार आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून यापूर्वी खा. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शिवस्वराज्य यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. कोल्हापूर व सांगलीमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे मध्यंतरी शिवस्वराज्य यात्रा स्थगित करण्यात आली होती. परंतु पुन्हा ही यात्रा सुरु झाली असून या यात्रेत अमोल कोल्हे यांच्यासह धनंजय मुंडे आणि अजित पवार यांचाही समावेश आहे.

तसेच, शिवसेनेकडून जनआशिर्वाद यात्रा तर भाजपकडून महाजनादेश यात्रेचे आयोजन केले आहे. तर कॉंग्रेसही पोलखोल यात्रा काढणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसलेली दिसत आहे.