रघुनाथ पाटील हे स्वयंघोषित शेतकरी नेते- सुनील तटकरे

नागपूर-  महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील हे स्वयं घोषित शेतकरी नेते असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी लगावला, ते शुक्रवारी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

याप्रसंगी माजी मंत्री अनिल देशमुख, रमेश बंग, आ. संजय बाजोरिया व इतर नेते उपस्थित होते. शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी 23 नोव्हेंबर रोजी नागपुरात पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादीची 12 डिसेंबरचा प्रस्तावित मोर्चा म्हणजे ‘नौसो चुहे खा के बिल्ली हज को चली’ अशास्वरुपाचा असल्याची टीका केली होती.

यासंदर्भात तटकरे यांना विचारले असता त्यांनी रघुनाथ पाटील स्वयंघोषित शेतकरी नेते असल्याचे सांगितले. तसेच शरद पवार कृषीमंत्री असतानासाखर आणि गव्हाच्या निर्यातीत भारत दुस-या क्रमांकावर असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आपल्या शासनकाळात शेतक-यांना 71 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिल्याचे तटकरे यांनी सांगितले. तसेच रघुनाथ पाटील यांनी टीका करण्यापेक्षा शेतक-यांच्या भल्यासाठी मोर्चाला पाठिंबा आणि सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

विधन परिषद निवडणुकीच्या व्यूहरचनेबाबत बोलताना तटकरे म्हणाले की, या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा काँग्रेसच्या उमेदवाराला राहणार आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत गेल्यावेळी तीन जागांसाठी काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी झाली होती. त्यावेळी दोन जागा राष्ट्रवादीला तर नारायण राणे यांची एक जागा काँग्रेसला देण्यात आली होती. आता राणे यांच्या राजीनाम्यामुळे रिकामी झालेली ही जागा काँग्रेसच्या कोट्यातील आहे. काँग्रेस देईल त्या उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी शेतकरी मोर्चासंदर्भात माहिती देताना तटकरे म्हणाले की, हिवाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादीतर्फे 11 डिसेंबर रोजी तर काँग्रेसतर्फे 13 डिसेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, समविचारी पक्षांनी एकत्र येत संपूर्ण ताकदीने सरकार विरोधात मोर्चा काढावा, असा विचार मांडला गेला. दोन्ही मोर्चे एकत्र करण्याची विनंती काँग्रेसने केली. ती राष्ट्रवादीने मान्य केली. त्यामुळे आता 12 डिसेंबर रोजी एकच मोर्चा निघणार असून त्यात शेकाप, पीरिपा, समाजवादी पक्ष देखील सहभागी होणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा 12 डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. या वेळी ते शेतकऱ्यांसाठी काढलेल्या मोर्चात सहभागी होऊन ते आपला वाढदिवस साजरा करणार असल्याचेही तटकरे यांनी सांगितले.