राज्य रस्तेविकास महामंडळामार्फत अधिग्रहीत करण्यात येणाऱ्या जमीनीचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार

सुनील तटकरे

मुंबई   – रायगड जिल्हयातील वाकण-पाली-खोपोली, इंदापूर-तळा-आगरदांडा व भालगाव-खाजणी आदी रस्त्यांच्या अधिग्रहणाबाबत व भूसंपादनाचा योग्य मोबदला मिळण्याबाबतच मुद्दा आमदार सुनिल तटकरे यांनी आज लक्षवेधीद्वारे उपस्थित केला.

राज्य मार्ग क्रमांक ५४८ (ए) या रस्त्याचे दुहेरीकरण सध्या सुरु आहे. यासाठी १९७४ साली जे भूंसपादन झाले असून त्यामध्ये अनेक त्रूटी असून जमीनीची संयुक्त मोजणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कामाचा वेग कमी असावा. शेतकऱ्यांचा रस्तेविकासाला विरोध नाही. या रस्त्यावर ४० वर्षापासून परळी व पेडली येथे घरे व त्यांची दुकाने आहेत. त्याच्या मोबदल्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे प्रस्ताव पाठवावा व राज्यमार्गाचे काम सुरु ठेवावे असे आमदार तटकरे यांनी सांगितले.

मुंबई-गोवा महामार्गासाठी २० वर्षापूर्वी जमीन संपादन करुन मोबदल्यासाठी जो कायदा लागू केला त्याच आधारे सुधागड-पाली,रोहा,तळा तालुक्यातील रस्ते रुंदीकरणाच्या अधिग्रहीत जमीनीला मोबदला मिळण्याची आग्रही मागणी सभागृहात केली.

उत्तरादाखल मंत्री एकनाथ शिंदे यांनी सुधारीत कायदयाद्वारे नवीन अधिग्रहीत करण्यात येणाऱ्या जमीनीला मोबदला देण्याचे मान्य केले.

इंदापूर-तळा-आगरदांडा रस्त्यावर दिघी बंदराची अवजड वाहतुक सुरु असते त्यामुळे सद्दस्थितीत रुंदीकरण करण्यात येणारा रस्ता पुरेसा नसल्याने त्यावर अपघाताचे प्रमाण वाढू शकते असे आमदार तटकरे यांनी चर्चेवेळी सांगितले व राज्यशासनाने इंदापूर येथे बाहयवळण रस्त्याचा प्रस्ताव केंद्राकडे रस्ते व दळणवळण मंत्रालयाकडे पाठवण्याविषयी सूचना केली.

सार्वजनिक बांधकाम उपक्रममंत्री एकनाथ शिंदे यांनी सदरची बाब तपासून प्रस्ताव केंद्रसरकारकडे सादर करण्याच्या सूचना विभागाला देण्यात येतील असे सांगितले.

रस्ता रुंदीकरणात जिल्हयात कोठेही शेतकऱ्यांचा विरोध असताना जमीनी अधिग्रहीत केल्या जाणार नाहीत व पूर्ण मोबदला देवूनच रुंदीकरणाचे काम करण्यात येईल असे एकनाथ शिंदे यांनी आश्वासित केले. चर्चेमध्ये आमदार अनिल तटकरे यांनीही सहभाग घेवून सद्दयस्थितीत रस्ता रुंदीकरण चालू असताना वहातुकीची काळजी घ्यावी व अपघात होवू नये याची दक्षता घ्यावी असे सूचवले.