या फसव्या सरकारला आता ओहोटी लागली आहे – सुनील तटकरे

sunil tatkare

टीम महाराष्ट्र देशा-  या फसव्या सरकारला आता ओहोटी लागली आहे मी कोकणातला व्यक्ती आहे. समुद्राची भरती-ओहोटी जवळून पाहिली आहे. २०१४ ला भाजपाची लाट आलेली असली, तरी या फसव्या सरकारला आता ओहोटी लागली आहे, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज उमरी येथे व्यक्त केला. हल्लाबोल आंदोलनात उमरी येथील सभेत ते बोलत होते.

बोंडअळीमुळे कापसाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंचनामे न करता मदत जाहीर करावी, अशी आग्रहाची मागणी त्यांनी केली. कर्जमाफी न देऊन शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या या सरकारला २०१९ मध्ये अपमानित केल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस स्वस्थ बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

विधिमंडळ पक्षनेते अजित पवार सभेत बोलताना म्हणाले की देशाचे कृषिमंत्री कोण आहेत हे देशातील शेतकऱ्यांना माहित नाही. माजी कृषिमंत्री शरद पवार साहेबांनी ७१ हजार कोटींची कर्जमाफी केली होती. पण या कृषीमंत्र्यांनी शेतकरी हिताचा कोणता निर्णय घेतलाय?

महिलावर्गाची सुरक्षितता आज महत्वाचा विषय आहे. पण सरकारकडे इच्छाशक्तीच नाही. गोदावरी नदीच्या आसपासचा परिसर बॅरेजेसमुळे आज हिरवागार झाला आहे. पण आताचे सरकार हे बॅरेज बंद करत आहे. त्यामुळे आपले प्रश्न समजण्याची आणि ते सोडवण्याची दृष्टी असणारे नेते जनतेने निवडून दिले पाहिजेत, असे ते म्हणाले.

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले की आज ५० रुपयाचे पेट्रोल ८१ रुपये झाले. ३५० रुपयांचा सिलेंडर ८५०च्या घरात पोहोचला. भाजपचे सरकार महागाई कमी करणार असे सांगून सत्तेत आले, पण प्रत्यक्षात ही महागाई वाढतच चालली आहे.