fbpx

अखेर निवडणूक लढवणार नसल्याची सुमित्रा महाजनांनी केली घोषणा

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कडून अद्याप इंदूर लोकसभा मतदार संघासाठी उमेदवार देण्यात आलेला नाही. त्यामुळे कोणता उमेदवार या लोकसभा मतदार संघाचे नेतृत्व करणार यावर तर्क लढवले जात आहेत. मात्र इथून मागे या मतदार संघाचे नेतृत्व करणाऱ्या भाजप नेत्या सुमित्रा महाजन यांनी आपण ही लोकसभा निवडणुक लढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता पक्षला वाटेल तो निर्णय घेण्याची मुभा आहे. असे त्यांनी प्रसार माध्यमांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

यंदाच्या निवडणुकीत भाजप ने ज्येष्ठ नेत्यांचे तिकीट कापले आहे. त्यांच्या ऐवजी नवीन नेतृत्वाला संधी देण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपने ८० वर्षीय सुमित्रा महाजन यांना उमेदवारी देण्यावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते. पण आता खुद्द सुमित्रा महाजन यांनी आपण निवडणूक लढणार नसल्याच स्पष्ट केले आहे.

दरम्यान आता पर्यंत सुमित्रा महाजन इंदूर या आपल्या हक्काच्या मतदार संघातून सलग आठ वेळा निवडून आल्या आहेत. तसेच त्यांनी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात देखील मंत्री पद भूषवले आहे. मोदी सरकारच्या काळात त्यांना लोकसभेच्या सभापती पदाचा बहुमान देण्यात आला. सुमित्रा महाजन या लोकसभेच्या दुसऱ्या महिला अध्यक्ष ठरल्या होत्या. मात्र आता सुमित्रा महाजन यांनी निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे.