विशाल पाटील म्हणजे मीच उभी आहे अस समजूनच मतदान करा , आ.सुमन पाटलांचे आवाहन

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूक ही संधी आहे. आर. आर. पाटील आणि वसंतदादांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी जिल्ह्यातील जनता माझ्या पाठीशी राहील. असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांनी ढवळी (ता. तासगाव) येथे व्यक्त केला. तर आमदार सुमन पाटील म्हणाल्या, भाजप सरकार शेतकरीविरोधी असून ते परत सत्तेत येता कामा नये. विशाल पाटील उभे आहेत म्हणजे मीच निवडणुकीला उभी आहे, असे समजून भरघोस मताधिक्याने निवडून देण्यासाठी कामाला लागा. त्यामुळे विशाल पाटील यांच्यासाठी सुमन पाटील मैदानात उतरल्याने सांगलीच्या लढाईत रंगत आली आहे.

दरम्यान, तासगाव तालुक्यात खासदार पाटील यांची गुंडशाही वाढली आहे. त्यांनी आमदार सुमन पाटील यांना कोंडून मारण्याचा प्रयत्न केला. तासगाव भोवतीच्या जमिनी दंडूकशाहीने रेटून स्वत: च्या नावावर करुन घेतल्या आहेत, दोन कारखाने घेतले, त्यांनी आपल्या नावावर मोठ्या प्रमाणावर मालमत्ता जमा केली आहे. आता ते उद्या आपल्या गावात येऊन तुमचे घरही नावावर करुन घेतील. त्यावेळी तुम्ही काही करू शकणार नाही. असा घणाघात देखील विशाल पाटील यांनी केला आहे.