fbpx

विजयानंतर सुजय विखेंनी केले पवारांना लक्ष्य,म्हणाले…

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. यामध्ये भाजप आणि मित्रपक्षांनी दणदणीत विजय मिळवला आहे. तर कॉंग्रेसचा राज्यासह देशात दारूण पराभव झाला आहे. नगरमध्येही भाजपच्या सुजय विखेंनी दणदणीत विजय मिळवला आहे.

लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर उमेदवारी करणारे सुजय विखे-पाटील यांनी अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून तब्बल २८१४७४ एवढ्या मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. याच विजयानंतर बोलताना सुजय विखे-पाटील यांनी नाव न घेता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना लक्ष्य केले आहे.

‘ज्यांना देशाचे नेतृत्व करायचे आहे ते मला हरविण्यासाठी अहमदनगरमध्ये तळ ठोकून बसले होते. त्यावेळेस त्यांनी ह्यात नसलेल्या माझ्या आजोबांविषयी जे वक्तव्य केले त्याचं उत्तर आज जनतेने निकालातून त्यांना दिलं आहे.’ अशी खरमरीत टीका अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार सुजय विखे-पाटील यांनी शरद पवार यांचं नाव न घेता केली.