fbpx

सुजय विखेंना दिलासा, बंडखोर खा.गांधी पुत्राची माघार

टीम महाराष्ट्र देशा : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना डावलून सुजय विखेंना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी नाकारल्याने गांधी समर्थक नाराज झाले होते, त्यामुळे दिलीप गांधी यांचे सुपुत्र सुवेंद्र गांधी यांनी बंडखोरी करत अपक्ष लढण्याची घोषणा केली होती. मात्र आता सुवेंद्र गांधी यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे.

सुवेंद्र गांधी यांनी हा निर्णय घेताना वडील खासदार दिलीप गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे सांगितले. सुवेंद्र यांनी बंडखोरीची घोषणा केल्यानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, भाजपचे उमेदवार डॉ.सुजय विखे यांनी गांधी परिवाराची भेट घेतली होती त्यामुळेच सुवेंद्र यांनी हा निर्णय घेतला असल्याची शक्यता आहे. सुवेंद्र यांच्या या निर्णयामुळे भाजप उमेदवार सुजय विखे यांना दिलासा मिळाला आहे.

सुवेंद्र गांधींनी माघार घेतल्यामुळे नगरमध्ये आता राष्ट्रवादीचे संग्राम जगताप आणि भाजपचे सुजय विखे यांच्यात सामना रंगणार आहे. सुवेंद्र यांच्या या निर्णयाचा सुजय विखेंना कितपत फायदा होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.