fbpx

शिंदे काका वर्षातून किती वेळा सोलापुरात असतात – सुजात आंबेडकर

सोलापूर: कॉंग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे हे प्रकाश आंबेडकर बाहेरचे उमेदवार आहेत म्हणतात, आंबेडकर उपरे असल्याची टीका करतात, मात्र शिंदे काका वर्षातून किती दिवस सोलापुरात असतात, असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारार्थ सोलापूरमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते.

वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत, आंबेडकर यांच्या उमेदवारीने सुशीलकुमार शिंदे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. तर भाजप उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामींना देखील निवडणूक सोपी राहिलेली नाही, प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारासाठी भाऊ आनंदराज आणि पुत्र सुजात देखील मैदानात उतरले आहेत.

सोलापूरमधील बाजारतळावर झालेल्या कॉर्नर सभेत सुजात यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे, मोदींच्या रुपात दुसरा हिटलर पंतप्रधान झाला आहे, त्यांच्याकडून अनेक संस्थेच्या अस्तित्वाला धक्का लावण्याचे काम केले जात आहे, तर भाजपची भीती दाखवून काँग्रेसने गेली ६५ वर्ष मागासवर्गीय समाजाला वापरून घेतल्याची टीका सुजातने केली आहे.