ऊस तोडणी कामगारांनी ग्रामसेवकाकडे नोंदणी करावी; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन 

उसतोड

परभणी : ऊसतोड कामगारांना शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ देण्यासाठी राज्य शासनाने राज्यातील सर्व ऊसतोड कामगारांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्याकरीता जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच बैठक संपन्न झाली. यावेळी उपमुख्य कार्यकारी यांचे प्रतिनिधी  यादव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, सहाय्यक कामगार आयुक्त मोहसिन सय्यद, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचे प्रतिनिधी, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड यांचे प्रतिनिधी श्रीमती मोरे आणि समाज कल्याण आयुक्त सचिन कवले यांची उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी गोयल म्हणाल्या की, जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्याना पत्र देवुन कारखान्याचे मुकादम व त्यांच्या क्षेत्रांतील मागील ३ वर्ष सलग काम करणाऱ्या ऊस तोड कामगारांची सविस्तर माहिती घेऊन ग्रामसेवकांनी ओळखपत्र देण्याची कार्यवाही करावी. तसेच ऊस तोड कामगार हे कामाकरिता एका जिल्ह्यातुन दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन आपली उपजीविका पार पाडत असतात. त्यामुळे कोविड-१९ चा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्व कारखान्यांनी त्यांच्याकडील सर्व ऊस तोड कामगारांचे सप्टेंबर अखेरपर्यंत लसीकरण करून घेण्याचे निर्देश ही जिल्हाधिकारी गोयल यांनी यावेळी दिले.

समाज कल्याण आयुक्त सचिन कवले म्हणाले की, जिल्ह्यात ५ हजार ९८४ ऊस तोड कामगार आहेत. ऊसतोड कामगारांनी ओळखपत्र मिळण्यासाठीच्या फॉर्ममध्ये पूर्ण नाव, पत्ता, आधारकार्ड क्रमांक, मोबाईल क्रमांक, बँक खात्याचा तपशील, बँकेचे नाव, बँक शाखा, खाते क्रमांक, आयएफएससी क्रमांक, मागील ३ वर्षात ऊसतोड कामगार म्हणून कार्यरत असलेला तपशील यात मुकादमाचे नाव, कारखान्याचे नाव, वर्ष व कोड नंबर देण्यात यावा. तसेच सोबत पासपोर्ट फोटोसह आधारकार्ड व बँक खाते बुकाची झेरॉक्स प्रत जोडावी, फॉर्म स्वाक्षरीसह भरून संबंधित ग्रामसेवकाकडे जमा करावे. जिल्ह्यातील सर्व ऊसतोड कामगारांनी आपली नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या