महाभियोग फेटाळला तरी लढा सुरू राहणार: सुप्रिया सुळे

supriya sule

पुणे: सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्यावर काँग्रेससह विरोधकांनी दाखल केलेला महाभियोगाचा प्रस्ताव उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी फेटाळून लावला आहे. मात्र उपराष्ट्रपतींनी जरी प्रस्ताव फेटाळला असला तरी आमचा लढा सुरूच राहणार असल्याच राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

सत्ताधारी भाजपकडून विरोधक न्यायव्यवस्थेबद्दल भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, न्यायालयीन कामकाज विरोधात पहिला आवाज न्यायव्यवस्थनेच उठवला आणि नंतर विरोधकांनी आवाज उठवायला सुरुवात केल्याचं सांगत सुळे यांनी भाजपचा आरोप फेटाळून लावला आहे.

दरम्यान, इंदापूर येथील शेतकरी आत्महत्ये संदर्भात प्रश्न विचारला असता, पाण्यासाठी शेतकऱ्याने आत्महत्या करणे अतिशय दुर्दैवी घटना आहे, सगळ्या शेतकऱ्यांना समान न्यायाने पाणी मिळणे गरजेचे असून या प्रकरणात सखोल चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती सुळे यांनी दिली आहे.

राष्ट्रवादीकडून भीम फेस्टिवलचे आयोजन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त 29 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसकडून भीम फेस्टिवलचे आयोजन करण्यात आल्याची माहिती खा. सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिली.