खडसे आणि भाजप म्हणजे ‘जिना यहां मरना यहां इसके सिवा जाना कहा’

नाशिक: पक्षाच्या उभारणीसाठी एकनाथ खडसे यांनी मोठ कष्ट घेतले आहेत. त्यामुळे ते पक्ष सोडणार नाहीत असा विश्वास अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. तसेच खडसे यांच्यासाठी भाजप म्हणजे ‘जिना यहां मरना यहां इसके सिवा जाना कहा’ असल्याचही ते म्हणाले. नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आता भाजपवर उघड नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. आपल्याला खोट्या भूखंड प्रकरणात अडकवण्यात सहभाग असणाऱ्या अंजली दमानिया यांना सरकारमधील मंत्रीच वाचवत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे, तसेच येत्या काळात छगन भुजबळ यांच्या सोबतीने ओबीसींसाठी लढा उभारणार असल्याच सांगत त्यांनी भाजप विरोधातच दंड थोपटले आहेत.

दरम्यान, खडसे जरी भाजपवर नाराज असले तरी ते पक्ष सोडणार नाहीत असा विश्वास भाजप नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. खुद्द देशाचे पंतप्रधान ओबीसी आहेत तर खडसे यांच्यावर अन्याय कसा होईल असा सवाल मुनगंटीवार यांनी उपस्थित केला आहे.